esakal | बेलवडे, कालवडे, शिरंबेत बिबट्याची दहशत; मशागतीची कामं खोळंबली
sakal

बोलून बातमी शोधा

Leopards

बेलवडे, कालवडे, शिरंबेत बिबट्याची दहशत; मशागतीची कामं खोळंबली

sakal_logo
By
सचिन मोहिते

काले (सातारा) : बेलवडे बुद्रुक येथे मृत अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या बछड्यामुळे कालवडे, बेलवडे, कासारशिरंबे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी, या परिसरातील शेतकरी शेत शिवारात जाताना घाबरत आहेत. त्यामुळे मशागतीची कामेही खोळंबली आहेत.

कालवडे, बेलवडे, कासारशिरंबे आदी परिसरात डोंगर दाऱ्या, दाट झाडी असल्यामुळे बिबट्या फिरताना शेतकऱ्यांना दिसतो. बेलवडे बुद्रुक येथील तेलक नावाच्या शिवारात येथील तरुण शेतकरी शिवाजी पवार यांना जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्यावर बिबट्याचा बछडा दिसला. यानंतर त्याने तेथून जीव वाचवण्यासाठी धूम ठोकली. याची बातमी ग्रामस्थांना दिल्यावर तेथे ग्रामस्थ आले. त्यांनी घटना स्थळावर पाहिले, तर त्यांना त्याची कोणतीच हालचाल दिसली नाही. याची माहिती वन विभागाला देण्यात आली.

वन विभागाने तातडीने येथे येऊन तो मृत अवस्थेत असलेल्या पहिले. त्याचा मृत्यू कशाने झाला आहे. यासाठी त्याचे शवविच्छेदन केले गेले आहे. मात्र, या मृत अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या बछड्याने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अजून एक मोठा बिबट्या व त्याचा बछडा असल्याचीही चर्चा आहे. शिवारात सोयाबीन, भुईमुग, भात, ऊस आदी पिकांची हिरवाई पसरली आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत.

वन विभागाकडून जागृतीची गरज

काले परिसरातील अनेक गावात बिबट्याची दोन बछडे व एक मादी अनेकांनी पाहिली आहे. वाठार येथे मागील दोन वर्षांपूर्वी एका बछडा सापळ्यात पकडला होता. वन विभागाने याबाबत कायम सतर्क राहण्याची भूमिका घेतली होती. बेलवडे येथील मृत अवस्थेत सापडलेल्या बिबट्यामुळे पुन्हा एकदा वन विभागाला सतर्क राहावे लागणार असून वन्य प्राणी-पक्ष्यांची जीविताची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. त्यासाठी वन विभागाकडून नागरिकांच्या मनातील वन्य प्राण्यांच्या बाबतीत असलेले समज गैरसमज दूर करण्याची गरज आहे.

loading image
go to top