Satara : कष्टाला कवेत घेतलेली आई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mother

Satara : कष्टाला कवेत घेतलेली आई

‘आई’ या शब्दांची ताकद अफाट आहे. या शब्दात असणारे सामर्थ्यही खूप मोठे आहे. आईविषयी काय लिहायचे? काय सांगायचे? काय बोलायचे? हा एक प्रश्नच असतो. मनात उमटलेल्या देवत्वाच्या भावना म्हणजे आईविषयीचे विचार.

माझी आई कोणत्या रूपात मन:चक्षूत उमटते ते लिहिणे कठीण आहे. तान्हेपणात आपण आणि आई वेगळे नसतोच मुळी. थोड्या कळत्या वयात पोचल्यावर मी माझ्या एका मित्राबरोबर शाळेत जाऊ लागलो. तेव्हा शाळेत माझे नावदेखील दाखल केले नव्हते. अशातच एक दिवस तो मित्र शाळेत गेला नाही. त्यामुळे मीही शाळेस दांडी मारली. हे पाहून आईने हातात एक छोटीशी छडी घेतली. ‘बोल, का चुकवलीस शाळा?’ असे म्हणत तिने मला झोडपायला सुरुवात केली. ‘इथून पुढे मी शाळा चुकवणार नाही,’ असे म्हटल्यावर मग माझा मार थांबला. तेव्हापासून पुढे मी एकही दिवस शाळा चुकवली नाही.

तेव्हा, आईने दिलेला तो मार माझ्या आयुष्याला दिशा देणारा ठरला. खरे तर, आई जेवढी कठोर, त्यापेक्षा सहस्रपटीने मायाळू. आम्हा तिघा भावंडांना लहानाचे मोठे करताना, वडिलांबरोबर संसाराचा रथ हाकताना तिला किती कष्ट पडले असतील? हे देवच जाणे.

१९७२ च्या दुष्काळात तिला रोजगार हमीची कामे करावी लागली. आमच्या घरी वीटभट्टी होती. त्यामुळे कष्ट, मेहनत हे शब्द आई- वडिलांच्या अंगवळणी पडले होते. ते दोघे नेहमीच पहाटे उठायचे. वडील विटांचा गारा मळण्यासाठी जात. आई स्वयंपाक उरकून लगबगीने विटा थापण्यासाठी हजर व्हायची. दिवसभर वीटभट्टीवर कष्टच कष्ट. संध्याकाळी घरी आल्यावर मग ती आम्हांला अभ्यासाला बसवायची. पुन्हा मग तिचे घरकाम सुरू व्हायचे.

आमचे घरी वडील कुंभारकामाची सर्व कामे ही बलुतेदारी पद्धतीने करत. आता वयाच्या ८२ व्या वर्षीही ते अखंडपणे कार्यमग्नच आहेत. आईने माती आणायची. ती बडवून बारीक करायची. घोड्याची लीद पाखडायची. गाडगी, मडक्यांना चिरा जाऊ नयेत म्हणून ती मातीत मिसळायची. मग वडील त्याचा गारा बनवत. सुगडी बनवत असत.

आई मातीच्या सुबक चुली बनवत असे. संपूर्ण पंचक्रोशीत असे एकही घर नसेल, की ज्या घरी आईने बनवलेली चूल नाही. बेंदराला मातीचे बैल, दसऱ्याला मातीचे घट, दिवाळीला मातीच्या पणत्या, संक्रांतीला सुगडी, अक्षयतृतीयेला पितृपूजनासाठी मातीचे कळसे, उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठ व घागरी, लग्नसमारंभात मांडव सजविण्यासाठी रंगीत सुगडी हे सर्व डोक्यावर घेऊन आईची पायपीट सुरू असते. वयाच्या दहाव्या वर्षांपासून आज सत्तरीपर्यंत अखंडपणे तिचे हात आणि पाय चालूच आहेत. गाडगी, मडकी, विटा, मातीची कौले भाजण्यासाठी झाडांचा पालापाचोळा, बाभळीच्या काट्या, डोक्यावरून वाहून आणणेही चालू आहे.

आमची घरची थोडी शेती आहे. आई- वडील त्या शेतात खूप कष्ट करतात. आईने आपल्या संसारासाठी शेतमजुरी केली आहे. शेतातील कौशल्याची सर्व कामे करण्यात तिचा हातखंडा आहे. तिच्या शेतमजुरीच्या उत्पन्नावरच आमच्या कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागत असे. आपल्या कौशल्यपूर्ण कामांचा वसा तिने आपल्या सुनांनाही दिला आहे.

प्रामाणिक आणि‌ नीतीनियमबद्ध कष्ट हेच आईचे जीवनसत्त्व आहे. वडिलांबरोबर संसाराचा रथ हाकताना जराही न दमणारी आई मी अनुभवली आहे. प्रत्येक सणसमारंभात हौसेने मिरवणारी आईही पाहिली आहे. घरातील लग्नसमारंभ असो, की धार्मिक विधी असोत आई उत्साहाने वावरत असते. आजूबाजूचे

सर्वजण तिचा सल्ला घेत असतात. सुईण म्हणूनही कितीतरी बाळांचे जन्मसोहळे आईने साजरे केले आहेत. एखाद्या दु:खद प्रसंगी किंवा अडचणीच्या वेळी आई म्हणजे सर्वांचे हक्काचे मन मोकळे करण्याचे, दु:ख हलके करण्याचे ठिकाण आहे. आर्थिक बाजू लंगडी असणारे आमचे कुटुंब. मात्र, आता आई- वडिलांच्या नीतीपूर्ण संस्कारांमुळे सुस्थितीत आहे.

मी प्राथमिक शिक्षक, धाकटे बंधू गोरख हे पोलिस निरीक्षक, बहीण रूपालीही सुशिक्षित आहे. तिचे पती रमेश कुंभार मुंबई पोलिस दलात कार्यरत आहोत. आपल्या दोन्ही सुना, रोहिणी व रोशनी यांना आई म्हणजे आपली स्वतःची आईच वाटते.

बंधू गोरख यांनी पोलिस उपनिरीक्षकपदाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्या खांद्यावरील स्टार्सचे अच्छादन बाजूला करण्याचा प्रथम मान माझे वडील ज्ञानोबा कुंभार व आई अरुणा यांना मिळाला. याचा आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान वाटतो. नातवंडांवरही तिची तितकीच माया आहे. त्यांच्या भवितव्यासाठी आई सतत दक्ष असते.

माझी चुलत भावंडे सतीश, महादेव व त्यांचे कुटुंबीय यांच्यावरही आईचा जीव आहे. त्यांनाही तिचा कायम आधार वाटतो.आईची अनेक रूपे आम्ही अनुभवली आहेत. हल्ली आई स्वामी समर्थांच्या साप्ताहिक बैठकांना नित्यनेमाने जाते. सकाळी देवपूजेनंतर त्यांच्या पुस्तकाचे पारायण करते. ‘ही सर्व सद्‌गुरूंची कृपा’ असे म्हणून सर्व आनंदरूपी संसार समर्थांना अर्पण करते. अशी माझी आई. कितीही लिहिले तरी अपूर्णच!

टॅग्स :Sataraworkermother by son