कलेढोणला लाखोंच्या शेती साहित्याची चोरी; तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

अंकुश चव्हाण
Friday, 20 November 2020

जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीत आघाडीवर असलेल्या कलेढोणच्या शेतकऱ्यांना चोरट्यांनी जेरीस आणले आहे. गावातील नायकुडे मळा, आतकरी मळा, शेटे मळा, भोसले मळ्यातील शेतकरी या चोऱ्यांमुळे हवालदिल झाले आहेत. एका-एका मळ्यातील साहित्यावर चोरटे डल्ला मारत आहेत.

कलेढोण (जि. सातारा) : कलेढोणच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे शेती साहित्य चोरीस गेले आहे. गावातील आजवर नायकुडे मळा, आतकरी मळा, शेटे मळा, भोसले मळ्यातील शेतकऱ्यांचे औषध फवारणी यंत्र, केबल्स, मोटरीचे साहित्य, महागडे पार्ट, ब्लोअर गन, मोटार साहित्य व महागड्या केबल्स चोरीस गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांना पकडण्याचे मायणी पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले असून मायणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आज शेतकरी आले होते. 

जिल्हात द्राक्ष निर्यातीत आघाडीवर असलेल्या कलेढोणच्या शेतकऱ्यांना चोरट्यांनी जेरीस आणले आहे. गावातील नायकुडे मळा, आतकरी मळा, शेटे मळा, भोसले मळ्यातील शेतकरी या चोऱ्यांमुळे हवालदिल झाले आहेत. एका-एका मळ्यातील साहित्यावर चोरटे डल्ला मारत आहेत. काल झालेल्या चोरीत नायकुडे मळ्यातील बबन नायकुडे यांचे औषध फवारणी यंत्र, आठ ब्लोअर गन असे 25 हजारांचे साहित्य चोरीस गेले आहे. प्रवीण साळुंखे यांचे दोन औषध फवारणी यंत्र व मोटारीचे फिटींग मटेरीयल असे 15 हजारांचे साहित्य, आतकरी मळ्यातील सोमनाथ माळी यांचे पाच हजारांचे शेती साहित्य, शिवाजी माळी यांचे औषध फवारणीसाठीचे सात एटीआर गन अशा 14 हजारांच्या मालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

दुकानांत गर्दी दिसल्यास दुकान 7 दिवस बंद : जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश 

आजवर चोरट्यांनी सुहास शेटे, सचिन माळी, विजय गवरे, सुरेश जाधव, श्रीकांत शेटे यांच्या मोटारीच्या तांब्याच्या तारा, केबल्स असे साहित्य लंपास केले आहे. रानमळ्यातील 11 औषध फवारणी यंत्र चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. गेल्या महिनाभरापासून अनेक शेतकऱ्यांचे शेती साहित्य चोरीस जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत मायणी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख यांच्याकडे बबन नायकुडे, प्रवीण साळुंखे, सोमनाथ माळी, शिवाजी माळी, सुहास शेटे आदी शेतकऱ्यांनी आपली कैफीयत मांडली. दरम्यान, याबाबत मायणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून उद्या शेतकऱ्यांना तक्रार देण्यासाठी बोलावल्याचे सहायक पोलीस हवालदार गुलाबराव दोलताडे यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft Of Millions Of Agricultural Materials At Kaledhon Satara News