नकली नाेटा बाजारात आणण्यापुर्वीच सातारा पाेलिसांनी उधळला डाव; तिघांना अटक

प्रवीण जाधव
Friday, 13 November 2020

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या पथकाने साध्या वेशात कोळेवाडी परिसरात सापळा लावला. 
 

सातारा : कोळेवाडी (ता. कऱ्हाड) येथे केलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) 94 हजार 500 रुपयांचा बनावट नोटा व देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
 
सतीश संपतराव पाटील (वय 43, रा. अंबवडे, ता. कऱ्हाड), अमर रघुनाथ मगरे (वय 32, रा. मारूल हवेली, ता. पाटण) व इंद्रजित अंकुश ओव्हाळ (वय 32, रा. सिल्व्हर ओक, विद्यानगर, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत.
 
कोळेवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या बस स्टेशन जवळ काही जण एकत्र येणार आहेत, तसेच त्यांच्याजवळ दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा असल्याची माहिती एलसीबीचे सहायक निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या पथकाने साध्या वेशात कोळेवाडी परिसरात सापळा लावला.

चहा विक्रेत्याच्या मुलाने उभारली बँक; विपरित परिस्थितीवर मात करीत गाठले यशोशिखर

त्या दरम्यान तिघे संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले. त्या वेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्यांच्याजवळ दोन हजार व पाचशे रुपयांच्या 94 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्याचबरोबर त्यातील एकाकडे पोलिसांना देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. या प्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार आतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, मयूर देशमुख, पंकज बेसके, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.

कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे पाच वर्षांच्या बालिकेची झाली आई- बाबांची भेट

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Arrested From Satara District For Bringing Fake Currency Satara News