दुष्काळग्रस्त भागातील नेर तलाव खुणावतोय पर्यटकांना

दुष्काळग्रस्त भागातील नेर तलाव खुणावतोय पर्यटकांना

विसापूर (जि. सातारा) ः खटाव तालुका तसा दुष्काळप्रवण क्षेत्रात येतो. परंतु, गेल्या दोन वर्षांत या तालुक्‍यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्‍यातील महत्त्वाचा असा ऐतिहासिक नेर तलाव सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहतो आहे. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिक, पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी, मौजमस्ती करण्यासाठी तलावास भेट देत आहेत. 

गेल्या महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे येथील निसर्ग बहरलेला आहे. सांडव्यावरून पडणारे तलावाचे वाहणारे पाणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या तलावाच्या उत्तरेकडे टेकडी असून, त्यावर शासनाचा "क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा असलेले राघवचैतन्य महाराज मंदिर आहे. या ठिकाणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गुरुपरंपरेतील संत राघवचैतन्य महाराज यांनी साधना केली होती. नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास येण्या-जाण्यासाठी थोडी वाट सोडता टेकडीला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. परिसरातील मनमोहक निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडत आहे. निसर्गरम्य परिसर, आल्हादायक वातावरण, पाण्याची उपलब्धता यामुळे तलावाच्या कडेला पर्यटकांच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. पर्यटकांना सूर्योदयापूर्वी या ठिकाणी भेट देता आली तर धुक्‍यामध्ये हरवलेल्या या तलावाचे मनमोहक रूप अनुभवण्यास मिळते. पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता नेर तलाव परिसराचा पर्यटन विकास करण्याची गरज दिसून येत आहे.

Video : सावधान! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता खचला
 

पुसेगावपासून पाच किलोमीटर... 

सातारा-पंढरपूर 548 सी या राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तरेला पुसेगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर परिसरात सुमारे 677 एकर क्षेत्रावर नेर तलाव पसरलेला आहे. येथे जाण्यासाठी नेरफाटा येथून नेर गाव व पुढे दोन किलोमीटर अंतरावर नेर तलाव आहे. तसेच पुसेगाव-फलटण रोड, ललगुण येथूनसुध्दा या पर्यटनस्थळाला भेट देता येते. हे ठिकाण गावापासून थोडे लांब असल्यामुळे त्याठिकाणी खरेदीसाठी दुकाने अथवा हॉटेल-चहापाणी अशी सोय नाही. त्यासाठी पर्यटकांना पाच किलोमीटर अंतरावरील पुसेगाव येथे यावे लागते. तसेच येथे येण्यासाठी एसटीची सुविधा नाही. 

मैत्रीच्या विश्वासावर निवडणूक ठामपणे लढवली आणि जिंकलीही : श्रीनिवास पाटील

राघवचैतन्य महाराज मंदिर आकर्षण 

यंदा झालेल्या मुबलक पावसाने नेर तलाव "ओव्हरफ्लो' झाला असून, लोकांच्या आकर्षणाचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येत आहे. नेर तलावाच्या निसर्ग सौंदर्यात लपलेले राघवचैतन्य महाराज मंदिर पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

Video : नांदगणेतील आजी जपताहेत लोकसंस्कृतीचा ठेवा

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com