आम्हांला नाेकरीत घ्या हाे! एसटीच्या 108 कर्मचाऱ्यांची आर्त हाक

संजय साळुंखे
Tuesday, 29 December 2020

भरती होऊनही प्रशिक्षण घेतले जात नसल्याने आमच्यावर अन्याय केला जात आहे. कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर असून, नोकरीची गरज असल्याने तत्काळ प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना रुजू करावे, असे प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सातारा : राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सरळसेवा भरतीमधील 108 कर्मचाऱ्यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून सेवापूर्व प्रशिक्षण स्थगित केले आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सेवेत घेण्याबाबत आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांना सेवेत न घेतल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
 
सातारा विभागात 2019 मध्ये सरळसेवा भरतीत अंतिम निवड होऊन पुरुष व महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले होते. त्या दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने 19 मार्चला प्रशिक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे संबंधित कर्मचारी प्रशिक्षणासाठी नसल्याने पगारही मिळत नाही, तसेच बहुतांश कर्मचाऱ्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने उदरनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्‍न पडला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सातारा विभागातील प्रशिक्षणार्थी सर्व चालक व वाहकांनी प्रशिक्षण सुरू करण्याबाबत आंदोलन केले होते. मात्र, अद्यापही प्रशिक्षण सुरू न झाल्याने प्रशिक्षणार्थी कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

सत्तेसाठी आमदार राणेंचा कानमंत्र

'गण गण गणात बोते'च्या जयघाेषात फलटण-शेगाव बससेवा सुरू
 
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून प्रशिक्षण बंद असल्याने पगार दिला जात नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, संपूर्ण राज्य अनलॉक असूनही पुन्हा प्रशिक्षण सुरू करण्यात आले नाही. भरती होऊनही प्रशिक्षण घेतले जात नसल्याने आमच्यावर अन्याय केला जात आहे. कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर असून, नोकरीची गरज असल्याने तत्काळ प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना रुजू करावे, असे प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सद्यःस्थितीत एसटीचे संचलन पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने फेऱ्यांची संख्या कमी आहे, तसेच प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना हजर करण्याचे आदेश मुख्य कार्यालयामार्फत आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात येणार आहे. 

पिराजी भंगारे, कर्मचारी वर्ग अधिकारी, एसटी विभाग 

राष्ट्रवादीच्या 'एकला चलो रे' च्या भूमिकेने वाईतील कॉंग्रेस आक्रमक 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trainee Employees Demands Maharashtra State Road Transport Corporation For Appointment Satara News