तूर डाळीचे वरण, आमटी खाणावळींमधून गायब!

​मुकुंद भट
Friday, 23 October 2020

डाळींऐवजी भाजीपाल्यांचा वापर वाढू लागला आहे.

ओगलेवाडी (जि. सातारा) : लोक कोरोनाने त्रस्त असताना त्यांना वाढत्या महागाईस तोंड द्यावे लागत आहे. बाजारात डाळींच्या भावात लक्षणीय वाढ झालेली आहे. तूर डाळीच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. किलोस भाव नव्वद रुपयांवरून 125 रुपये झाला आहे. अन्य डाळींच्या भावातही किलोस 20 रुपयांनी वाढ झाली असल्याने सामान्य ग्राहक मेटाकुटीस आले आहेत. खाणावळींत तूर डाळीचे वरण व आमटी गायब झाली आहे. दर वाढीने त्यास फटका बसला आहे.
 
हरभरा डाळ 75 रुपये, मूग डाळ व उडीद डाळ 100-110 रुपये व मसूर डाळ 70 रुपये किलो भाव आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीने उत्पादनात झालेल्या घटीने भाव वाढले आहेत. साधारण महिना दीड महिना डाळींचे भाव बाजारात तेजीत राहण्याची शक्‍यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जाते. दसरा व दिवाळी सणामुळे हरभरा डाळीस वाढती मागणी आहे. तूर डाळीऐवजी मूग डाळीचा वापर वाढणार आहे.

स्टाईल इज स्टाईल! कार्यकर्त्याची इच्छा पुरी, उदयनराजेंची बाईक सवारी!  

डाळींच्या वाढत्या दराने कडधान्यांना मागणी होत आहे. मूग 95 रुपये, मटकी 110 रुपये, चवळी 80 रुपये, हरभरा, वाटाणा 140 रुपये असे किलोचे भाव आहेत. डाळींऐवजी भाजीपाल्यांचा वापर वाढू लागला आहे. नवा कांदा व बटाटा आला तरी त्यांच्या भावात किंचित घसरण आहे. कांदा 40 ते 60 रुपये व बटाटा भाव 35 ते 45 रुपयांच्या दरम्यान आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tur Dal Price Increased In Local Market Satara News