Satara : शेरे गावात रोज दोन तास मोबाईल, टीव्ही बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TV

Satara : शेरे गावात रोज दोन तास मोबाईल, टीव्ही बंद

कऱ्हाड : मोबाईल व टीव्हीचे दुष्परिणाम हा सध्या सार्वत्रिक प्रश्न निर्माण झालेले आहे. मुलांबाबत तर त्यावर मार्ग कसा काढायचा हा प्रत्येक घरात रोज उपस्थित होणारा प्रश्न आहे. गावातील सुधारांसाठी सकारात्मकतेने झटणाऱ्या शेरे ग्रामस्थांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यावर सामूहिक मार्ग काढला आहे. आता या गावात सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत दररोज सर्व घरातील मोबाईल व टीव्ही बंद राहणार आहेत.

मोबाईल हा सध्या प्रत्येकाचा अविभाज्य भाग बनल्यासारखी परिस्‍थिती निर्माण झालेली आहे. घरातील प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. आधुनिक उपकरणांचे जसे फायदे असतात, तसेच तोटेही होतातच. तीच परिस्‍थिती मोबाईलच्या वापराची आहे. आज प्रत्येकाच्या घरात मोबाईल हा एक समस्या बनत चालला आहे. मुलांचा अभ्यास असो, की संस्कार यावर परिणाम होत आहेच. घराघरांतील, मित्रामित्रातील संवाद हरवत चालला आहे. त्यातून मानसिक व शारीरिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागत असून, काही पत्नी-पत्नींची प्रकरणे घटस्फोटापर्यंत पोचू लागली आहेत.

प्रत्येक घरात या प्रश्नावर दररोज विचार किंवा वाद होत आहेत; परंतु त्यावर पर्याय काढण्याचा व तो पाळण्याची नियमितता कोणी करताना दिसत नाही; परंतु सार्वत्रिक बनलेल्या या प्रश्नावर शेरे ग्रामस्थांनी आपल्यापरीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून काल गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत यावर मार्ग काढला आहे. काल महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त गावात स्वच्छता अभियान झाले.

त्यानंतर गावकऱ्यांची एकत्र बैठक झाली. तेथे मोबाईल व टीव्हीमुळे मुलांचा अभ्यासावर होणाऱ्या परिणामांची चर्चा झाली. त्यातून संपूर्ण गावाने मिळून टीव्ही व मोबाईल दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप निकम यांनी त्याचे आवाहन केले. या कालावधीत मुलांना अभ्यासाला बसण्याची सवय लावण्यात येणार आहे. या निर्णयातून केवळ मुलांच्याच नव्हे, तर कुटुंबातील सर्वच मंडळीचे परस्परांशी असलेले नाते दृढ होण्यास मदत होणार आहे. त्या दृष्टीने हा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक घराचा सहभाग आवश्यक

भारतीय संस्कृतीत त्यागाला महत्त्व दिले आहे. कोणत्याही प्रिय व्यक्ती किंवा गोष्टीपासून तटस्थता राखता आली पाहिजे, हे वेगवेगळ्या मार्गातून सांगण्यात आले आहे. सध्या मोबाईलच्या वापराबाबतीत तीच तटस्था प्रत्येकात येणे गरजेचे बनले आहे. त्या दृष्टीने शेरे गावाने सर्वांसमोरच एक आदर्श निर्माण केला आहे. त्यातून बोध घेत प्रत्येक कुटुंबात मंथन होणे आवश्यक आहे. सर्वच कुटुंबांनी याबाबत मंथन करून आपली अशी एक नियमावली तयार करून मोबाईल वापराबाबत तटस्था अंगीकारणे आवश्यक आहे.

मोबाईल, टीव्हीचे दुष्परिणाम

  • एकाग्रता संपून आगतिकता वाढते

  • डोळ्याची दृष्टी कमकुवत होण्याची शक्यता वाढते

  • स्वभावात रागीटपणा येण्याची शक्यता असते.

  • नाहक वेळ वाया घालवण्याचाही प्रकार वाढतो.