esakal | कामाशिवाय संसाराचा गाडाच चालत नाही; साताऱ्यात 20 हजार महिला मदतीपासून 'वंचित'
sakal

बोलून बातमी शोधा

Women

कामाशिवाय संसाराचा गाडाच चालत नाही; साताऱ्यात 20 हजार महिला मदतीपासून 'वंचित'

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : काम केल्याशिवाय ज्यांचा संसाराचा गाडा चालत नाही, अशा जिल्ह्यात सुमारे 20 हजार घरकाम करणाऱ्या महिला घरेलू कामगार असताना शासनाकडे मात्र फक्त 142 महिलांचीच घरेलू कामगार म्हणून कामगार आयुक्त कार्यालयात नोंद आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात शासनाकडून (Government) दिल्या जाणाऱ्या 1,500 रुपयांच्या मदतीपासून (Financial Assistance) जिल्ह्यातील महिला घरेलू कामगार वंचित राहणार आहेत. महिला घरेलू कामगार म्हणून केवळ नोंदणी न झाल्याने या महिलांसाठी जिल्ह्यात येणाऱ्या तीन कोटींच्या मदतीपासून जिल्हा मुकणार आहे. (Twenty Thousand Women In Satara District Do Not Get Financial Assistance From The Government)

मुळातच दोन वर्षांपासून घरेलू काम करणाऱ्या महिलांची कुटुंबे उपासमारी सहन करत आहेत. कष्ट करायची तयारी आहे. मात्र, हाताला काम नाही, अशी सध्या त्यांची स्थिती आहे. त्यामुळे त्या हतबल आहेत. सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या धोरणापासूनही त्या वंचित राहत आहेत. 20 हजारांपैकी केवळ 142 महिला घरेलू कामगारांची शासनाकडे नोंद आहे. शासकीय अनास्थेमुळे त्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या 1,500 रुपयांच्या मदतीपासून त्या महिला वंचित राहणार आहेत. भविष्याची तरतूद नाही, शासनाच्या सुविधा नाहीत, कामगार म्हणूनही नोंद नाही, अशी जिल्ह्यातील घरेलू महिलांची स्थिती आहे.

'HRCT Test'साठी महिला-मुलांना 'माणदेशी' करणार आर्थिक मदत : प्रभात सिन्हा

रोजच्या संसारातही त्या मेटाकुटीस आल्या आहेत. पुढे कसं होणार, या विचाराने त्या हैराण आहेत. त्यात शासनाचीही मदत मिळणार नसल्याने स्थिती बिकट आहे. घरेलू कामगार म्हणून जिल्ह्यात त्यांची नोंदणीच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 20 हजारांवर घरेलू महिला कामगार असताना केवळ 142 महिलांचीच शासकीय दप्तरी नोंद आहे. त्यामुळे शासनाने एक लाख घरेलू कामगारांना 1,500 रुपयांप्रमाणे दिलेल्या मदतीपासून जिल्ह्यातील 20 हजार महिला वंचित राहतील. त्यांना ती मदत द्यावी, यासाठी घरेलू कामगार महिला संघटना झटत आहेत. या महिलांना मदत कशी मिळेल, यासाठी शासकीय पातळीवर विचार होण्याची गरज आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. धुणं-भांडी करणाऱ्या महिलांसह मुलांना सांभाळणाऱ्या महिलांचे काम सध्या बंद आहे. लॉकडाउनच्या कालावधीत त्यांच्या हाताला काम नाही. लॉकडाउनमुळे शासनाने मदत जाहीर केली. केवळ नोंद नाही, म्हणून मदत नाकारणे योग्य नाही. त्यांचा सर्व्हे करून मदतीसाठी प्रयत्न व्हावेत.

-आनंदी अवघडे, अध्यक्षा, घरेलू कामगार संघटना, सातारा

Twenty Thousand Women In Satara District Do Not Get Financial Assistance From The Government

loading image
go to top