पाचगणी - पोलिस ठाण्यात दोन कर्मचारी कोरोनाबाधित

रविकांत बेलाेशे 
Saturday, 28 November 2020

पाचगणी शहर व परिसरात कोरोनाने काही काळ विश्रांती घेतली होती; परंतु पुन्हा कोरोनाचे रुग्ण रोज सापडत आहेत. सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, दिवाळीनंतर कोरोनाची आणखी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात होती.

भिलार ( सातारा) : पाचगणी पर्यटनस्थळांवर अजूनही कोरोनाची धास्ती कायम असून, पुन्हा एकदा पोलिस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोना पाचगणीत कायम असल्याने नागरिकांची चिंता वाढत आहे. सध्या पाचगणीत पर्यटन हंगाम सुरु असून, लॉकडाउननंतर कसाबसा हंगाम सुरू झाल्याने नागरिक व व्यापारी यांनी सुस्कारा सोडला; परंतु येणाऱ्या पर्यटकांमुळे तो वाढेल, की काय याची भीती होती. आकडा जरी कमी असला तरी त्यात सातत्य असल्याने लोक चिंताग्रस्त आहेत. 
 
पाचगणी शहर व परिसरात कोरोनाने काही काळ विश्रांती घेतली होती; परंतु पुन्हा कोरोनाचे रुग्ण रोज सापडत आहेत. सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, दिवाळीनंतर कोरोनाची आणखी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात होती. पाचगणीत रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पाचगणी शहर पोलिस ठाण्यातील दोघा पोलिस शिपायांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम यांनी दिली.

सध्या नेहमीप्रमाणे दिवाळीची सुट्टी साधून पर्यटक पाचगणीत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे. पर्यटन हंगाम असल्याने सध्या पाचगणी शहरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले व्यवसाय सांभाळताना गर्दी न करण्याची अट पाळावी. प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून, विनाकारण गर्दी करू नये, असे डॉ. कदम यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two employees of Pachgani police station have been corona