सातारा : देगाव येथील दोघांना लूटमारप्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

सातारा : देगाव येथील दोघांना लूटमारप्रकरणी अटक

सातारा - कोडोली येथील एका हॉटेलसमोर थांबलेल्‍या ट्रकचालकास मारहाण करत लुटल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी लखन चंद्रकांत जाधव (वय ३२) आणि हरीश आनंदराव देवघड (वय ३८, दोघेही रा. देगाव, ता. सातारा) यांना आज अटक केली. बीड येथील विनायक पुंजा आंधळे हे कोडोली येथील एका कंपनीत ट्रकमधून साहित्‍य आणण्‍यास गेले होते. ट्रकमधील साहित्‍य उतरण्‍यास वेळ लागणार असल्‍याने आंधळे हे त्‍याच परिसरातील एका झाडाखाली थांबले होते. या वेळी त्‍याठिकाणी दुचाकीवरून दोन युवक आले. त्‍यांनी आंधळे यांना मारहाण करत त्‍यांच्‍याकडील १ हजार ७०० रुपयांची रोकड लुटत पळ काढला. याची तक्रार नंतर आंधळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली. याचा तपास वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्‍या सूचनेनुसार उपनिरीक्षक सुधीर मोरे, कर्मचारी सुजित भोसले, अविनाश चव्‍हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, सागर गायकवाड यांनी सुरू केला.

या पथकाने मिळालेल्‍या माहितीनुसार लखन जाधव, हरीश देवघड या दोघांना अटक केली. त्‍या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्‍यांच्‍याकडून लुटलेली रोकड आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्‍त केली आहे. अटकेतील दोघांनी यापूर्वी अशाच पद्धतीने गुन्‍हे केल्‍याची शक्‍यता पोलिस वर्तवत आहेत. मारहाणीदरम्‍यान त्‍या दोघांनी आंधळे यांना दगड मारून खाली पाडले. आंधळे खाली पडल्‍यानंतर ते दोघे दुचाकी सुरू करून पळण्‍याच्‍या प्रयत्‍नात होते. याचदरम्‍यान आंधळे यांनी स्‍वत:च्‍या मोबाईलचा वापर करत दुचाकीसह त्‍या दोघांचा फोटो काढला. हा फोटो आणि इतर तांत्रिक माहितीच्‍या आधारे पोलिसांनी जाधव, देवघड यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.

टॅग्स :SataracrimerobberyTruck