साताऱ्यात माजी सैनिकासह दोघांना लुटले

गिरीश चव्हाण
Monday, 30 November 2020

ज्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लुटलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे. याचा तपास सहायक निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.

सातारा : लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीवर बसलेल्या दोघांनी येथील भूविकास बॅंक चौकात चाकूचा धाक दाखवत मारहाण करून माजी सैनिकासह एका व्यावसायिकास लुटले. लूटमार करणाऱ्या दोघांनी माजी सैनिकासह व्यावसायिकाकडील सुमारे 50 हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. याची फिर्याद संदीप विलास भोसले (रा. जवान हाउसिंग सोसायटी, सदरबझार) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. यानुसार पोलिसांनी दत्तात्रय उत्तम घाडे (रा. सूर्यवंशी कॉलनी, दौलतनगर, करंजे) आणि लाल्या ऊर्फ मयूर काशिनाथ राठोड (रा. आकाशवाणी झोपडपट्टी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
 
सदरबझारमधील जवान हाउसिंग सोसायटीत संदीप विलास भोसले हे राहण्यास आहेत. भोसले हे माजी सैनिक असून, गुरुवारी (ता. 26) रात्री 9 च्या सुमारास ते दुचाकीवरून करंजे येथून भूविकास बॅंक चौकाकडे येत होते. वाटेत त्यांना दोघांनी लिफ्ट मागितली. आम्हाला भूविकास बॅंकेजवळ सोडा, असे त्यांनी भोसले यांना सांगितले. यानुसार भोसलेंनी त्यांना दुचाकीवर बसवले. भूविकास बॅंक चौकाजवळ असणाऱ्या शाळेजवळ आल्यानंतर त्या दोघांनी भोसले यांना दुचाकी थांबविण्यास सांगितले. दुचाकी थांबल्यानंतर त्यांनी भोसले यांना चाकूचा धाक दाखवला. चाकूचा धाक दाखवत दगडाने मारहाण करतानाच त्या दोघांनी भोसले यांच्याकडील 2 मोबाईल हॅंडसेट, कॅन्टीन कार्ड, पाकीट, एटीएम कार्ड असा सुमारे 38 हजारांचा ऐवज लुटला. 

याचठिकाणी त्या दोघांनी सुंदर मोतीजी डांगे (रा. दौलतनगर, करंजे) यांना सुद्धा चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्यांनी डांगे यांच्याकडील मोबाईल हॅंडसेट, रोकड असा ऐवज लुटला. यानंतर लूटमार करणाऱ्यांनी डांगे यांचीच दुचाकी ताब्यात घेत पळ काढला. डांगे यांच्याकडील सुमारे 28 हजारांचा ऐवज त्यांनी लुटला आहे. याची फिर्याद भोसले यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. यानुसार दत्ता घाडगे आणि लाल्या (पूर्ण नाव पत्ता नाही) या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मराठा ही निर्णायक जात; विश्वासघात झाल्यास जनताच तुम्हांला खाली खेचेल : उदयनराजे
 
यानुसार पोलिसांनी तपास करत व्याजवाडी (ता. वाई) येथून दत्तात्रय उत्तम घाडे (रा. सूर्यवंशी कॉलनी, दौलतनगर, करंजे) आणि लाल्या ऊर्फ मयूर काशिनाथ राठोड (रा. आकाशवाणी झोपडपट्टी) या दोघांना अटक केली. अटकेतील दोघांकडून लुटलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे. याचा तपास सहायक निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Youths Arrested By Shahupuri Police Station Satara News