स्वार्थ साध्य झाल्यावर ते आपआपल्या मार्गाने निघून जातील; उदयनराजेंचा 'महाविकास'ला टाेला

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 1 December 2020

आम्ही हे केले ते केले असे सत्ताधारी म्हणत आहेत. वास्तविक वर्षभरात त्यांनी काहीच केलेले नाही. मी टीका करीत नाही तर वस्तुस्थिती सांगत असे उदयनराजेंनी नमूद केले.

सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकणार असा विश्वास खासदार उदयनराजे भाेसले यांनी येथे व्यक्त केला. आज (मंगळवार) सकाळपासून सातारा शहरात या निवडणुकीच्या मतदानासाठी सातारा शहरातील महाराजा सयाजीराव हायस्कूल, आझाद काॅलेज येथे मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. येथील महाराजा सयाजीराव विद्यालय येथील मतदान केंद्राच्या बाहेर उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, विधान परिषदेतील सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील. याचे प्रमुख कारण म्हणजे हे सर्व पक्ष यापुर्वी एकत्र नव्हते. केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्र आले आहेत. ते स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. विचार सर्वांचे वेगळे आहेत. वेगवेगळ्या विचारांचे एकत्र येतात त्यावेळीस काेणते तरी अमिष अथवा ताकदीचा उपयाेग करावा लागताे. ते कायमस्वरुपी एकत्र राहत नाही कारण त्यांचा स्वार्थ साध्य झाला की ते आपापल्या मार्गाने निघून जातात.

भाजप हा पक्ष विचाराने एकत्र आहे. ध्येय उद्दीष्ट हे निश्चित आहे. त्यामुळेच सर्वजण कायमस्वरुपी राहतात. बहुतांश मतदारसंघात मी गेलाे हाेताे. त्यावेळी चर्चा हीच हाेती. आपण यांना मदत करायची का. आगामी काळात हे आमदारकीच्या निवडणूकीत समाेरासमाेर लढणार आहेत. त्यामुळेच ते मदत करण्यास इच्छुक नाही. बाेलणे साेपे असते त्यामुळेच ते आम्ही एकत्र आहाेत असे सांगताहेत.

उमेदवार असूनही मतदानापासून वंचित; बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले संतापले 

आम्ही हे केले ते केले असे सत्ताधारी म्हणत आहेत. वास्तविक वर्षभरात त्यांनी काहीच केलेले नाही. मी टीका करीत नाही तर वस्तुस्थिती सांगत असे उदयनराजेंनी नमूद केले. ते म्हणाले मतदारांच्या अपेक्षा असतात. त्या पुर्ण हाेत नसतील तर मतदारांच्या दिशाभूल करण्यासारखा प्रकार आहे. आपण स्वतःशी खाेटे बाेलू शकत नाही तसाच प्रकार त्यांचा आहे. मतदारांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही. लवकरच भाजप सत्तेत येईल असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.

उदयनराजेंचे हे म्हणणे हास्यास्पद; शशिकांत शिंदेंचा टाेला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Critisiced Mahavikas Aghadi Satara News