मराठा ही निर्णायक जात; विश्वासघात झाल्यास जनताच तुम्हांला खाली खेचेल : उदयनराजे

सिद्धार्थ लाटकर
Sunday, 29 November 2020

हा प्रश्न दाेन्ही राजेंनी साेडवावा असे शरद पवार यांनी म्हटले आहे या प्रश्नावर बराेबरच आहे त्यांचे, आम्ही प्रयत्न करीतच आहाेत असे खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले.

सातारा : राज्यात मराठा ही निर्णायक जात आहे. विश्वासघात झाल्यास सरकारला जनताच खाली खेचेल. ऍक्शनला रिऍक्शनला मिळाल्यास जबाबदारी सरकारची असेल असा इशाराच खासदार उदयनराजे भाेसले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) जलमंदिर पॅलेस येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर नाव घेता टीका केली. उदयनराजे म्हणाले अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले नेते आजही सत्तेत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. मराठा समाजात मोठी नाराजी आहे. सध्या कोरोनाचं संकट आहे. अन्यथा मराठा समाज सरकारमधील नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही. प्रत्येक निवडणुकीत आरक्षणाचं आश्वासन दिलं जातं. पण आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जात नाही. हा विषय जाणिपुर्वक प्रलंबित ठेवला जाताे असा आराेपही उदयनराजेंनी केला.

त्यावेळी आरक्षणाचा विचार का झाला नाही? उदयनराजे

वर्षानुवर्षे मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे इतकी वर्षे सत्तेत असलेल्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत. अजून किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार, असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आरक्षणाचा मुद्दा पुढे नेला. त्यांनी जात पात पाहिली नाही. तुम्हांला हे का जमत नाही?,' असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केला.

दरम्यान तुम्ही या प्रश्नावर शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करणार का, या प्रश्नावर नुसती चर्चा करून काय उपयोग? तोडगा निघणार असेल, तर चर्चा करण्यात अर्थ आहे, असं उत्तर उदयनराजेंनी दिलं. दरम्यान हा प्रश्न दाेन्ही राजेंनी साेडवावा असे शरद पवार यांनी म्हटले आहे या प्रश्नावर बराेबरच आहे त्यांचे, आम्ही प्रयत्न करीतच आहाेत. एवढंच वाटत तर संभाजीराजे छत्रपतींना मुख्यमंत्री करा मग अशी टिप्पणी उदयनराजेंनी केली.

आरक्षणामुळे चांगले मित्र गमावत चाललोय, उदयनराजेंनी व्यक्त केली खंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Critisiced Sharad Pawar On Maratha Reservation Trending News Satara News