केंद्रासह राज्य सरकारला उदयनराजेंनी विचारला जाब; खासदार, आमदारांच्या दाेन वर्षांचे निधीचे काय केलं

सिद्धार्थ लाटकर
Monday, 26 October 2020

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोक मारायला लागली आहेत. काही जण डोक्‍याने फक्त पैशाचा विचार करतात आणि मी फक्त भावनेचा विचार करतो. जर हिंमत असेल तर समोर येऊन बोला, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोनाच्या उपचारासाठी होत असलेल्या पैशांबाबत (बिल) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या काळात प्रत्येकाला बेड, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. खरं तर आमदार, खासदारांच्या निधीचे पैसे गेले कुठे, याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिले पाहिजे, असा प्रश्‍न उपस्थित करुन उदयनराजेंनी राज्यकर्त्यांनी बुद्धी द्यावी अशी प्रार्थना आई तुळजाभवानीस केली. दरम्यान हा सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे, असा आरोपही उदयनराजेंनी केला आहे. 

विजयादशमी निमित्त रविवारी जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन यंदा शाही मिरवणूक रद्द करण्यात आली. प्रारंभी उदयनराजे भोसले कोरोनाचे सावट पसरल्याने विविध रुढी, परंपरा सण यावर्षी साजरे करता येत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर राजघराण्याच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या. उदयनराजे म्हणाले, कोरोनामुळे सर्व काही हिरावून घेतले आहे. जो काल होता तो आज नाही हे ऐकून वाईट वाटते. प्रत्येकाने खूप खूप काळजी घ्यावी एवढेच मी सांगतो. देशातील सर्व खासदार आणि आमदारांचे दोन वर्षातील संपूर्ण खासदार,आमदार निधी वर्ग करून घेतल्याने लोक आम्हांला जाब विचारत आहेत. मी केवळ राज्यपुरता न बोलता हा निधी नेमके गेला कुठे? कोरोना काळात प्रत्येकाला बेड, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे मग एवढे खासदार, आमदार निधीचे पैसे गेले कुठे याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने देणे गरजेचे आहे, असा प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, आई भवानी राज्यकर्त्यांना बुद्धी दे. ज्या लोकांनी राज्यकर्त्यांना निवडून दिले त्यांची काळजी नाही. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र नसलेल्या राज्यकर्त्यांना पदावर राहण्याची लायकी नाही.

उदयसिंह उंडाळकरांच्या रुपाने कॉंग्रेसचे सिमोल्लंघन?
 
कोरोनाबाबतचे निर्णय जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिले असल्याने आणि प्रशासन लोकप्रतिनिधींचा अभिप्राय घेत नाही. त्यामुळे ही संपूर्ण यंत्रणा जनसामान्यांना विचारात घेऊन केली जात नाही. हा सर्व खटाटोप पैशासाठी चालला असल्याचा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला आहे. कोरोनाबाबत प्रांत, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या महसूल विभागाचा आरोग्य यंत्रणेशी काय संबंध? याबाबत डॉक्‍टर, फिजीशिअन यांना मिळणाऱ्या वेतनात वाढ करावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. 

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोक मारायला लागली आहेत. काही जण डोक्‍याने फक्त पैशाचा विचार करतात आणि मी फक्त भावनेचा विचार करतो. जर हिंमत असेल तर समोर येऊन बोला, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे. जगात एवढे व्हायरस आहेत. त्यापैकी कोरोना एक आहे. परंतु सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोणाला कोरोना होऊ नये, असेही उदयनराजेंनी नमूद केले. परंतु हे असेच चालत राहिले तर सामान्य जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरु देणार नाहीत. मला प्रश्न विचारायचे नाही. मला वेदना होतात म्हणून हे सर्व बोललो असेही उदयनराजेंनी नमूद केले.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Questions About Corona Fund Trending News Satara News