शशिकांत शिंदेंचं कामच तसं आहे; उदयनराजेंचा टाेला

उमेश बांबरे
Wednesday, 2 December 2020

राज्य सरकारला दोष देण्याशिवाय भाजपचे नेते काहीच करताना दिसत नाहीत. मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला हाेता.

सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन साता-यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप नेत्यांच्या मुद्दे खाेडण्याचे काम सुरु झालेले आहे. एकमेकांवर टीका टिप्पणी देखील हाेऊ लागली आहे. खासदार उदयनराजे भाेसले यांच्या पत्रकार परिषदेस आमदार शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा उदयनराजेंनी दुस-याचे खापर फाेडण्याचे काम त्यांच्याकडून सुरु असल्याची टिप्पणी केली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी (रविवारी) मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून राज्य सरकारवर प्रत्यक्षपणे, तर शरद पवारांसह माजी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वपक्षीयांची भावना आहे. मात्र, लोकांमध्ये बुद्धिभेद करून समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले हे राज्य सरकारवर आरोप करत आहेत. वास्तविक, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. न्यायालयातही भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असेल, तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नीही सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने सूचना कराव्यात यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा असे म्हटले हाेते.

उदयनराजेंचे हे म्हणणे हास्यास्पद; शशिकांत शिंदेंचा टाेला 

आमदार शशिकांत शिंदेंच्या विनंतीनुसार मराठा आरक्षणाबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार का, या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, ""आमदार शिंदे हे माझे जवळचे मित्र आहेत. ते उत्कृष्ट संसदपटू आमदार आहेत; परंतु दुसऱ्यावर खापर फोडायचे चुकीचे आहे.'' आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी राज्याची आहे. केंद्राचा काही संबंध नाही, असे ते म्हणाले. तुम्हाला सोडविता येत नसेल, तर बाजूला व्हा. ते स्वत: करत नाहीत आणि दुसऱ्यावर खापर फोडायचे काम करतायत, असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवारांच्या दुर्लक्षामुळेच मराठा समाजाचे नुकसान; मराठा महासंघाचा आराेप 

Edited By : Siddharth Latkar 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Says Maratha Reservation Responsibility Is Of Maharashtra Government Satara News