Factory Election : 88 वर्षांच्या योद्ध्याला पराभवाचा धक्का

Makarand Patil
Makarand Patilesakal
Summary

88 वर्षांच्या योद्ध्याला साथ देण्याच्या भावनिक आवाहनाला स्पष्टपणे नाकारून विश्वासार्ह, कर्तृत्वालाच येथील मतदारांनी पुन्हा एकदा साथ दिलीय.

लोणंद (सातारा) : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Khandala Sugar Factory Election) भावनिक आवाहनाला थारा न देता विश्वासार्ह, कर्तृत्वाच्या हाकेला साद घालत मतदारांनी परिवर्तन घडवले. खंडाळा साखर कारखाना उभारणीसाठी ज्यांनी आयुष्य पणाला लावले आणि खंडाळा तालुक्यातील जनतेत ज्यांच्या प्रती कमालीचा आदरभाव, आपुलकी व प्रेम आहे, ते ज्‍येष्ठ नेते शंकरराव गाढवे सरांनाही या निवडणुकीत वयाच्या ८८ व्या वर्षी पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. उतारवयात सरांचा झालेला हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागणारा आहे. त्यातून मतदारांकडून त्यांच्याबद्दल असणारा आदरभाव व जिव्हाळा तसूभरही कमी झालेला नाही.

Makarand Patil
ED काय, ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही; NCP आमदाराचा थेट इशारा

मात्र, आर्थिक अडचणीच्यावेळी केवळ आदरभाव, प्रेम कुचकामी ठरते, हे दाखवून देताना काहीतरी नवा मार्ग मिळणार असेल त्याबाबत विश्वास वाटत असेल तर तशी संधी दिली पाहिजे. त्यातून वाई- खंडाळा-महाबळेश्वरसारख्या मतदारसंघात गेली १३ वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी जर ही नौका वाचवण्यासाठी धाव घेण्याचा निर्णय घेतला असेल तर खंडाळ्याच्या जनतेला दुधात साखर पडल्याची भावना झाल्याने येथील जनतेने आमदार पाटील यांच्या कर्तृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून काहीही झाले तरी कारखाना सुरू करण्याच्या त्यांच्या हाकेला जोरदारपणे साथ दिली आहे. हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे. ८८ वर्षांच्या योद्ध्याला साथ देण्याच्या भावनिक आवाहनाला स्पष्टपणे नाकारून विश्वासार्ह, कर्तृत्वालाच येथील मतदारांनी पुन्हा एकदा साथ दिली आहे. त्यातून भुईंज कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले व त्यांच्या संचालक मंडळाच्या बेजबाबदार व कर्जबाजारू कारभाराने 'ड' वर्गात गेलेला आपला कारखाना कधी सुरू होणार, कोण कर्ज देणार, घेतलेले कर्ज कसे फिटणार, पैसा कसा उपलब्‍ध होणार? का तालुक्यात असलेल्या कारखान्याकडे फक्त बघत बसावे लागणार, पहिले पाडे पंचावन्न करत ऊस घालवण्यासाठी दुसऱ्याची दारे धुंडाळावी लागणार, या प्रश्नांची सोडवणूक करण्यात मदन भोसले आणि त्यांचे सहकारी कमी पडल्यानेच निवडणुकीत हे चित्र स्पष्ट झाले आहे. शंकरराव गाढवे सरांचे चिरंजीव अनिरुद्ध गाढवे यांनाही फारसे काही करता आले नाही. त्यांनाही पराभूत व्हावे लागले.

दुष्काळी खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडी व नीरा-देवघरचे पाणी आल्याने ज्वारी, बाजरी, हुलगा, मटकी पिकवणाऱ्या खंडाळा तालुक्याचे बागायती क्षेत्र वाढले. ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले. येथील शेतकऱ्यांना ऊस घालवण्यासाठी अन्य कारखान्यांच्या दारोदार फिरावे लागत होते. येथील शेतकऱ्यांची होणारी ही फरफट थांबावी, येथील शेतकऱ्यांना तालुक्यातच हक्काचा कारखाना उभा राहावा, हे स्वप्न उराशी बाळगत ज्‍ये‍ष्ठ नेते शंकरराव गाढवे यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेअर्स गोळा करून माजी खासदार प्रतापराव भोसले व भुर्इंज कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सलग ३० वर्षे हाडाची काडे करून अनेक अडचणींना तोंड देत म्हावशीच्या माळावर भुईंज कारखान्याच्या सहकार्यातून भागीदारी तत्त्‍वावर खंडाळा तालुक्यातील जनतेचे हक्काच्या कारखान्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.

Makarand Patil
LIC नं करोडो ग्राहकांना पाठवला SMS; पैसे मिळवण्यासाठी 'हे' काम करा लवकर

कारखाना सुरू झाल्यावर सुरवातीचा पहिला हंगाम चांगला चालला. त्यानंतर १८ दिवसांचा हंगाम झाला. गेल्या वर्षी तर काही दिवस कारखाना चालल्यावर बंद राहिला. तो अद्याप बंद आहे. त्यातून शेतकऱ्यांची व इतर देणीही वेळेवर मिळत नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्यात विद्यमान संचालकांबाबत काहीशी चीड निर्माण झाली होती. त्यातून आमदार पाटील यांनी खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष व ज्ञानदीप परिवाराचे संस्थापक व्ही. जी. पवार की ज्यांचे खंडाळा कारखाना उभारणीत मोलाचे योगदान आहे, त्यांनाच आपल्याबरोबर घेतले. अन्य सात संचालकही त्यांच्याबरोबर आणण्यात त्यांना यश आले. त्यातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपासून आमदार मकरंद पाटील यांच्यापासून दुरावलेले ज्‍येष्ठ नेते बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील व खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील यांनाही त्यांनी आपल्या गोटात सामील करून घेतले आणि निवडणुकीचे पॅनेल उभारले.

Makarand Patil
निवडणुकीत राष्ट्रवादी मारणार विजयी षटकार? शिवसेनेकडून 'टाइट फिल्डिंग'

तत्पूर्वीच्या शेतकरी हितासाठी निवडणुका बिनविरोध करण्यात आमदार मकरंद पाटील यांनी तडजोडीची भूमिका घेऊन निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले. मात्र, यावेळी सर्व पातळ्यांवरच्या चर्चेतून मार्ग न निघाल्याने यावेळी ही निवडणूक लागली. निवडणुकीदरम्यान लोणंदचे (कै.) अॅड. बाळासाहेब बागवान यांचा गटही बरोबर आल्याने आणि जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मनोज पवार, खंडाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. एस. वाय. पवार, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, अॅड. शामराव गाढवे, हणमंतराव साळुंखे, बंडा ऊर्फ किशोर साळुंखे, जिल्हा कोविड समन्वय समितीचे सदस्य डॉ. नितीन सावंत आदींनी प्रचार यंत्रणा राबवली. आमदार पाटील हे तर पायात भिंगरी बांधून रात्रंदिवस स्वतः प्रत्येक मतदारापर्यंत पोचून आपली भूमिका मांडत होते. त्यामुळेच निवडणुकीत हे यश मिळवता आले.

Makarand Patil
हिम्मत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवा

‘किसन वीर’ची देणी चुकती करून भागीदारी मोडीत काढावी लागणार

खंडाळा कारखान्याच्या सत्तेबरोबर आमदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर अनेक जबाबदाऱ्यांचे भले मोठे ओझे माथी येऊन पडले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील वर्षी का होईना पण कारखान्याचे धुराडे पेटवावे लागणार आहे. खंडाळ्याचा कारखाना येथील शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवून कारखाना सुरू करावा लागणार आहे. ‘किसन वीर’ची देणी चुकती करून भागीदारी मोडीत काढावी लागणार आहे. कायदेशीर लढाया लढाव्या लागणार आहेत. त्यासाठी मोठा पैसा उभा करण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे. खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातात उसाचे चार पैसे यावेत, शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, या हेतूने येथे साखर कारखाना उभारला, तो हेतू साध्य होण्यासाठी प्रथमतः कारखाना सुरू करून उसाला चांगला भाव मिळावा, वेळेत बिले मिळावीत, हीच अपेक्षा येथील शेतकरी नव्याने सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाकडून बाळगून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com