
सातारा : चांदीच्या साखळीने खुनाचा उलगडा
कऱ्हाड - गोळेश्वर येथे एका शेतात तब्बल १५ दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा केवळ सापळा सापडला. पोलिसांनाही त्याची ओळख पटवणे मुश्कील झाले होते. त्याच्याच शेजारी पडलेल्या कापडाच्या पिशवीवरून खुनाची ओळख पटली. मात्र, त्याच्या तपासाचे आव्हान होते. त्यात मृताजवळ सापडलेल्या तुटलेल्या चांदीच्या साखळीने खुनाच्या तपासाचा एकेक पदर उलगडत झारखंडला लपून बसलेल्या संशयिताच्या पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत मुसक्या आवळल्या.
गोळेश्वरच्या शेतात पोलिसांना सडलेला मृतदेह सापडला. त्याचा खून झाल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले. त्याचवेळी एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल होती. त्यांना पोलिसांनी बोलविले. मृताशेजारी सापडलेली कापडी पिशवी व त्यातील कपडे त्यांना दाखवले. कपड्यावरून त्यांच्या नातेवाइकांनी मृतदेह ओळखला. मात्र, त्याचा खून कसा झाला, त्याचा उलगडा होणे अपेक्षित होते. त्या तपासाचे आव्हान होते. पोलिसांनी संशयित राहात असलेल्या मंगळवार पेठेत चौकशी केली. मृतदेह गोळेश्वरला कसा, येथून तपासाला सुरुवात झाली. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे व त्यांच्या डीबी पथकासमोर तपासाचे आव्हान होते, तरीही पोलिसांनी वेगात तपास केला. त्याच वेळी त्याच्यासोबत आणखी एक जण होता. त्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांना मृतदेहाजवळ चांदीची साखळी सापडली होती. ती माहिती गोपनीय ठेवली होती. चौकशीसाठी फौजदार अर्जुन चोरगे, पोलिस हवालदार एम. एम. खान, संदीप पाटील यांचे पथक झारखंडला गेले. तेथे संशयित सापडला. त्याला गोड बोलून कऱ्हाडाला आणण्यात त्यांना यश आले. कऱ्हाडला आणल्यानंतर पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी तपास केला. सहायक पोलिस निरीक्षक गोडसे तपास करत असताना त्याच्या गळ्यात चांदीची चेन त्यांना दिसली. त्यांनी ती कोणाची आहे, असे विचारले. त्या वेळी तो गडबडला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकत गेला. अखेर त्याने खुनाची कबुली दिली. जुगारात हरलेले पैसे वसुलीसाठीच त्याला मारल्याची कबुली दिली. ती चांदीची चेनही त्याचीच असल्याचे त्याने मान्य केले.
खून झालेला व खून करणारा दोघेही झारखंडचेच होते. दोघेही येथे बांधकाम कामगार म्हणून सोबत राहात होते. त्यातील एक जण झारखंडच्या पोलिस रेकॉर्डवरील संशयित होता. झारखंडला खून करून तो येथे आला होता. त्याचा उलगडा पोलिसांनी तपासात केला. खुनाच्या तपासात घटनास्थळी पोलिसांना तुटलेल्या चांदीची साखळी सापडली होती. त्यावरून शंका बळावत ती लिंक थेट संशयितापर्यंत पोचली आणि खुनाचा उलगडा झाला. खुनाची कोणतीही माहिती हाती नसताना पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत खुनाचा छडा लावून मृताच्या मित्रालाच बेड्या ठोकल्या. मित्रासोबत जुगारात हरलेली नऊ हजारांची रक्कम परत मिळवण्यासाठी खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसही हादरले होते. खुनाचा तपास करणाऱ्या पथकाला बेस्ट डिटेक्शनचे पारितोषिक मिळाले.
तपासातील शिलेदार...
पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, फौजदार अर्जुन चोरगे, हवालदार एम. एम. खान, संदीप पाटील, पोलिस कर्मचारी जयसिंग राजगे, नितीन येळवे, संजय जाधव, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, शंकर गडांकुश यांनी केलेली कामगिरी महत्त्वाची ठरली.
Web Title: Unravel Murder With Silver Chain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..