मुकाबला काेराेनाशी : मृत्यूदर राेखण्यासाठी साता-यात पडताहेत सुविधा अपु-या

उमेश बांबरे
Sunday, 27 September 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आतापर्यंत 25 हजार 001 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. दररोज सुमारे 800 ते हजार रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत, हाच जिल्ह्याला मोठा दिलासा असून, एकूण बाधितांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण 64 टक्के आहे. तर नवीन बाधित होण्याचे प्रमाण हे 35 टक्के आहे.

सातारा : कोरोना विषाणूने जिल्ह्यात 35 हजारांचा टप्पा गाठलेला आहे. संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनास यश आलेले नाही. परंतु, बाधितांचा आकडा वाढताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही 64 टक्के आहे. तर मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 2.8 ते 3.0 टक्‍क्‍यांवर आले आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनापुढे संसर्ग रोखण्यासोबतच मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान असून, त्यासाठी आवश्‍यक सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. 

गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. जून महिन्यापासून कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला. त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची सख्या तब्बल 35 हजारांवर गेली आहे. नऊ हजार तीनशे 51 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर 1060 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दररोज 30 ते 40 रुग्णांचा मृत्यू होत आहे. याला वेळेत उपचार न मिळणे हेच महत्त्वाचे कारण आहे. वाढत्या रुग्णसंख्येपुढे अपुरी पडणारी आरोग्य यंत्रणा हेही तितकेच महत्त्वाचे आहे. लॉकडाउनच्या काळात प्रशासनाने आगामी काळात वाढणारी रुग्णसंख्या गृहित धरून आरोग्य यंत्रणेची तयारी करायला हवी होती. मात्र, सर्वजण केवळ आकडेवारीचा खेळ करत राहिल्याने प्रत्यक्ष पायभूत सुविधा निर्माण करण्यात वेळ गेला. आता रुग्णसंख्या वाढल्याने त्या प्रमाणात उपचारासाठीची यंत्रणा अपुरी पडताना दिसत आहे. सर्वांच्या प्रयत्नातून यंत्रणाही उभी राहिली; पण आता मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक भावनेतून डॉक्‍टर्स, नर्सेस, इतरांनी पुढे येऊन कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मदत करणे आवश्‍यक आहे. पण, कोरोना होईल या भीतीने अनेकजण पुढे येत नसल्याचे दिसत आहे.

साताऱ्यातील मूकमोर्चा स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेअंती निर्णय
 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आतापर्यंत 25 हजार 001 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. दररोज सुमारे 800 ते हजार रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत, हाच जिल्ह्याला मोठा दिलासा असून, एकूण बाधितांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण 64 टक्के आहे. तर नवीन बाधित होण्याचे प्रमाण हे 35 टक्के आहे. सध्या 36 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृत्यू होण्याचे प्रमाण 2.8 ते 3.0 टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे. आता हे वाढलेले मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाला पेलायचे आहे. त्यासाठी तातडीने व चांगल्या दर्जाच्या उपचारपध्दती उपलब्ध कराव्या लागणार आहेत. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य लागणार असून, लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचे उपचार, औषधे तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच कोरोनाविरोधातील लढाई सुसह्य होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Upgradation Of Facilities In General Hospital Is Neccessary Satara News