Vineyard Collapse : द्राक्ष बागांचे सव्वा कोटींचे नुकसान; वादळी वारे व गारपिटीचा तडाखा

खटाव तालुक्यातील डांभेवाडी, शिंगाडवाडी येथे वादळी वारे, पाऊस व गारपीटीने सुमारे साडे दहा एकर क्षेत्रांतील द्राक्षबागेचे तब्बल सव्वा कोटी रूपयांचे नुकसान झाले.
vineyard collapse by storm wind and hailstorm
vineyard collapse by storm wind and hailstormsakal
Summary

खटाव तालुक्यातील डांभेवाडी, शिंगाडवाडी येथे वादळी वारे, पाऊस व गारपीटीने सुमारे साडे दहा एकर क्षेत्रांतील द्राक्षबागेचे तब्बल सव्वा कोटी रूपयांचे नुकसान झाले.

वडूज/कातरखटाव - खटाव तालुक्यातील डांभेवाडी, शिंगाडवाडी येथे वादळी वारे, पाऊस व गारपीटीने सुमारे साडे दहा एकर क्षेत्रांतील द्राक्षबागेचे तब्बल सव्वा कोटी रूपयांचे नुकसान झाले. तर येलमरवाडी नजिकच्या भैरोबाचा डोंगर येथे वाऱ्याने मंडप व व्यवसायिकांचे नुकसान झाले. याशिवाय डांभेवाडी, बोंबाळे येथील जनावरांचा गोठा देखील उध्वस्त होऊन दोन जनावरे जखमी झाली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी ता. ७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या परिसरात जोरदार वादळी वारे व पावसाला सुरूवात झाली. सुमारे दिड तास वादळी वारे व पावसाचे तांडव सुरू होते. डांभेवाडी येथील विक्रम दादासाहेब बागल पाटील यांनी दोन एकर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्ष बागेची लागवड केली होती. दोन दिवसांनी द्राक्षांची काढणी करून ती निर्यात करण्यात येणार होती. वादळी वाऱ्याने द्राक्ष बागेच्या भोवती लावलेले लोखंडी खांब वादळी वाऱ्याने पूर्णत: उखडून पडल्याने द्राक्ष बाग पूर्णत: जमिनदोस्त झाली.

बागेत सर्वत्र जमिनीवर द्राक्षांच्या घडांचा खच पडलेला दिसून येत होता. यामध्ये तब्बल ३५ ते ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे बागल यांनी सांगितले. याशिवाय येथील गुलाबराव बागल यांची एक एकर क्षेत्रातील निर्यातक्षम द्राक्ष बागही जमिनदोस्त होऊन त्यांचे ३६ लाख रूपयांचे नुकसान झाले. बागेत सुमारे २० ते २२ टन द्राक्षे काढणीस आली होती, वाऱ्याने तीदेखील पूर्णत: जमिनदोस्त झाली. मधुकर कृष्णा बागल यांच्या पाऊण एकर बागेचे १७ लाख रूपयांचे नुकसान झाले. केशव बागल यांच्या दोन एकर बागेचे सुमारे ३० लाख रूपयांचे नुकसान झाले. किरण कुलकर्णी यांच्या सव्वा एकर बागेचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाले.

हणमंत गुरव यांच्या एक एकर बागेचे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले. कृष्णात बागल यांच्या अर्धा एकर द्राक्ष बागेचे २ लाख रूपयांचे नुकसान झाले. विपूल बागल यांच्या एक एकर बागेचे २ लाख रूपयांचे नुकसान जाले. वैभव बागल यांच्या दिड एकर बागेचे दिड लाख रूपयांचे नुकसान झाले. याशिवाय येथील गोरख थोरवे यांनी गेल्या महिन्यात नव्याने उभारलेल्या जनावरांच्या गोठ्याचे शेडही वादळी वाऱ्याने उध्वस्त झाले. त्यामध्ये शेडचा सिमेंट पत्रा चक्काचूर झाला तर लोखंडी अँगलही वाकले. गोठ्यातील दोन गायींना लोखंडी अँगल लागल्याने इजा झाली.

शिंगाडवाडी येथील सचिन शिंगाडे यांच्या द्राक्ष बागेचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. तसेच बोंबाळे (भाग्यनगर) येथील श्रीरंग नलवडे यांचे जनावरांचे पत्र्याचे शेडही वादळी वाऱ्याने उखडून पडले. येलमरवाडी नजिक असलेल्या भैरोबाचा डोंगर येथे देवाची वार्षिक यात्रा सुरू होती. काल या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने डोंगरावर भाविकांसह मेवा मिठाई, खेळणी आदी दुकानांचीही मोठी गर्दी होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्याने मंदिरालगत घातलेला कापडी मंडप पूर्णत: फाटला. तसेच या मंडपाचे बांबूही वाऱ्याने तुटले. यामध्ये मंडपाचे मालक बाळासाहेब काटकर (नरवणे,ता.माण) यांचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले. तसेच यात्रेसाठी आलेल्या मेवा मिठाई, खेळण्यांच्या दुकानांचे छतही वाऱ्याने फाटले.

आईस्क्रीमचे लहान गाडेही वाऱ्याने कोलमडून पडल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी अजमेर मुल्ला यांच्या हाताला पत्रा लागून दुखापत झाली. अचानक सुरू झालेल्या या वादळी वाऱ्याच्या रौद्ररूपाने यात्रेकरूंची मोठी त्रेधातिरपीट उडाली. पावसामुळे डोंगरावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने अनेक वाहने रूतून बसली होती. घटनास्थळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, तालुका कृषी अधिकारी राहूल जितकर तसेच स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. गावकामगार तलाठी शिल्पा गोरे, कृषी सहाय्यक सिकंदर जगताप, दुर्योधन कदम, राजेंद्र तांबे, ग्रामसेवक काशिद यांनी नुकसानीचे पंचनामे केले.

याभागांत वादळी वारे व गारपीटीने झालेल्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानीबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात येईल. द्राक्ष बागेशिवाय अन्य शेती पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली जात आहे.

- सौ. भाग्यश्री फरांदे (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,सातारा)

सुमारे ३० लाख रूपयांचे कर्ज काढून द्राक्ष बागेची लागवड केली होती, दोन दिवसांत ही द्राक्षे निर्यात होणार होती. मात्र वादळी वारे, पाऊस व गारपीटीने संपूर्ण द्राक्ष बाग जमिनदोस्त झाल्याने माझ्या कुटूंबाचे अपरिमीत आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी.

- विक्रम बागल (द्राक्ष उत्पादक शेतकरी, डांभेवाडी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com