वासोटा किल्ला पर्यटनाची भुरळ कायम | Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासोटा किल्ला पर्यटनाची भुरळ कायम

सातारा : वासोटा किल्ला पर्यटनाची भुरळ कायम

सातारा : जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या वासोटा किल्ल्याविषयीची पर्यटकांची भुरळ कायमच आहे. किल्ला पर्यटनासाठी खुला झाल्यानंतर गेल्या महिनाभरात तब्बल पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी या किल्ल्यास भेट दिली आहे.

नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षणस्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे रूप विलक्षण ठरते. उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. कोरोना काळात किल्ल्यावर वन विभागाकडून प्रवेशबंदी होती. २३ ऑक्टोबरपासून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

हेही वाचा: वर्ग दोन कमी करून एक करण्यासाठी शिबिरे जिल्हाधिकारी यांचा निर्णय

त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. एक महिन्याच्या आतच तब्बल पाच हजार पर्यटकांनी वासोट्यास भेट दिली आहे. दिवाळीची सुटी, रविवारचा दिवस, सलग सुटीचे दिवस यामुळे येथील पर्यटन चांगलेच बहरले आहे. पर्यटकांसह ट्रेकर्स दाखल होत असून त्यांना उत्तम सुविधा पुरविल्या जात असल्याचे हॉटेल व्यावसायिक राजेंद्र संकपाळ यांनी सांगितले. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक बोट व्यावसायिक, तंबू व्यावसायिक यांना दिलासा मिळाल्याचे अक्षय गोरे या युवकाने नमूद केले.

जलविहारास प्राधान्यक्रम

वासोटा पर्यटनाबरोबरच शिवसागरातील जलविहारास पर्यटक प्राधान्य देत आहेत. त्यादृष्टीने बामणोली, तापोळ्यात गर्दी होत आहे. विनायकनगरचे दत्त मंदिर, सह्याद्रीनगर, कास, घाटाई मंदिर, वजराई पठार, राजमार्ग आदी स्थळांनाही पर्यटक भेटी देत आहेत.

loading image
go to top