धूर ओकणारी वाहने रडारवर : ‘आरटीओ’ कडून सात लाख वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : धूर ओकणारी वाहने रडारवर : ‘आरटीओ’ कडून सात लाख वसूल

सातारा : धूर ओकणारी वाहने रडारवर : ‘आरटीओ’ कडून सात लाख वसूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : धूर ओकणारी वाहने रडारवर

‘आरटीओ’कडून सात लाख वसूल; ऑनलाइन पीयुसीकडे वाहनधारकांनी फिरवली पाठ

प्रशांत घाडगे : सकाळ वृत्तसेवा

सातारा : गेल्या वर्षभरापासून वाहनांची प्रदूषण पातळी तपासणारी (पीयुसी) केंद्रे ऑनलाइन झाली आहेत. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी दिसणारी पीयुसी वाहने दिसेनाशी झाली आहेत. या परिस्थितीमुळे बहुतांश वाहनचालकांनी पीयुसी काढण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे, परिवहन विभागाच्या जाळ्यात अनेक वाहनचालक सापडत असून, मागील वर्षभरात आरटीओने दोषी आढळलेल्या एक हजार ९८८ वाहनचालकांकडून सात लाख ३० हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे.

केंद्र सरकारने ऑनलाइन पीयुसी मशिन करण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार राज्यात आरटीओ त्याची अंमलबजावणी करत आहे. राज्यातील ‘५०’ आरटीओमध्ये एकूण दोन हजार २०० पीयुसी सेंटर आहेत. यातील सातारा जिल्ह्यात ६९ पीयुसी मशिन ऑनलाइन आहेत. एखाद्या वाहनाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेतल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणता येते. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येते. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रदूषण होत आहे.

दरम्यान, पीयुसी केंद्रे ऑफलाइन असताना अनेक बनावट पीयुसी काढल्या जात होत्या. त्यामुळे, अनेकदा वाहनांची तपासणी न करता पासिंग केले जात होते. यासारखे प्रकार वाढल्याने प्रदूषणाची पातळीतही वाढ झाली होती. याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणली असून, पीयुसी केंद्रेही ऑनलाइन केली आहेत. तसेच पीयुसी काढलेल्या वाहनांची सर्व माहिती ऑनलाइन आरटीओ कार्यालयाकडे एकत्रित होत असल्याने फसवा-फसवीचा प्रकार बंद झाला आहे. दरम्यान, पीयुसी नसणाऱ्या वाहनांवर दुसरा व्यक्ती वाहन चालवित असल्यास एक हजार दंड तर स्वत: मालक चालवित असल्यास ५०० रुपये दंड आकारला जातो. तसेच ऑनलाइन पीयुसीचा दर दुचाकीसाठी ३५ रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहन ७०, पेट्रोल व सीएनजीवरील वाहन ९०, डिझेलवरील वाहनाचे ११० रुपये आकारले जातात. याचबरोबर पीयुसीचा कालावधी एक वर्षाचा असल्याचे आरटीओ विभागाने सांगितले.

पीयुसी केंद्रे ऑफलाइन असताना बनावट पीयुसी काढल्या जात होत्या. मात्र, पीयुसी केंद्रे ऑनलाइन झाल्याने फसवणुकीला आळा बसत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ६९ पीयुसी ऑनलाइन आहेत. तसेच पीयुसी नसणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू आहे.

- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

loading image
go to top