नवजात बालकांसाठीही व्हेंटिलेटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ventilators for newborns too

नवजात बालकांसाठीही व्हेंटिलेटर

सातारा - नवजात बालकांच्या उपचारात संजीवनीचे काम करू शकणाऱ्या तीन सिपॅप मशिन (व्हेंटिलेटर) जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कमी वजनाच्या तसेच कमी दिवसांच्या बाळांना जीवदान देण्यासाठी त्याची मोठी मदत होण्याबरोबर नातेवाईकांची खासगी रुग्णालयात त्यासाठी होणाऱ्या हजारो रुपयांच्‍या आर्थिक भुर्दंडापासून सुटका होणार आहे.

नवजात बालकांवरील उपचार ही खासगी रुग्णालयांत खर्चिक बाब आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या ती आवाक्याबाहेरची असते. परंतु, पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी काही ना काही उलाढाली करत नागरिक हा खर्च पेलतात. त्यातून अनेकजण कर्जबाजारीही होतात. याचा विचार करून शासनाने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू केले आहेत. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातही अतिदक्षता विभाग सुरू आहे. त्यातून सर्वसामान्य नागरिकांचे लाखो रुपये वाचण्यास मदत झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात तज्‍ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे उपचार मिळाल्यामुळे आजवर हजारो बालकांचे जीव वाचले आहेत. हा अतिदक्षता विभाग सुसज्ज असला तरी, आत्तापर्यंत नवजात बालकाला श्वसनाचा त्रास होत असल्यास कृत्रिम श्वासोश्वास देण्यासाठी आवश्यक व्हेंटिलेटरप्रमाणे काम करणारी सिपॅप मशिन उपलब्ध नव्हती. त्यामुळे अशा बालकांना खासगी रुग्णालयात पाठविण्याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर पर्याय नव्हता. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ही अडचण आता दूर झाली आहे. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आवश्यक असणारी तीन सिपॅप मशिन विभागाला उपलब्ध झाली आहेत. त्यातील एक मशिन हे सेव्ह चिल्ड्रेन या सेवाभावी संस्थेकडून मदत स्वरूपात दिले आहे. कमी वजन किंवा कमी दिवसांत जन्मलेल्या बालकांना जन्मताच जोरजोरात श्वास घेणे, हृदयाचे ठोके वाढणे, श्वास घेताना घरघर आवाज येणे, ऑक्‍सिजन मास्क लावूनही कमी प्रमाणात ऑक्सिजन शरीरात जाणे, रक्तदाब कमी होणे, ओठ निळे पडणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे नवजात बालकाच्या आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण होते.

त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे त्याच्या फुफ्फुस व रक्तात इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. कधी मूल दगावण्याचीही भीती असते. या परिस्‍थितीत हे यंत्र बालकाला संजीवनी देण्याचे काम करते. या यंत्रातून लयबद्ध पद्धतीने हळूवारपणे ऑक्सिजन किंवा हवा फुफ्फुसात ढकलली जाते. त्यामुळे बालकाला श्वास घेणे सुलभ होते. त्यामुळे त्याच्या हृदयाची व फुफ्फुसाची वाढ योग्य पद्धतीने होण्यास मदत होते. साधारणतः नवजात बालकाच्या परिस्‍थितीनुसार दोन ते चार दिवस हे यंत्र लावावे लागते. त्याचा खासगी रुग्णालयात दिवसाचा खर्च सुमारे १४ हजारांपर्यंत जातो. जिल्हा रुग्णालयात हे मशिन उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरिकाला हा भुर्दंड टाळता येणार आहे.

कोविड ‘आयसीयू’तही दोन मशिन

नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाबरोबर जिल्हा रुग्णालयात सध्या कोविडबाधित बालकांच्या उपचारासाठीही अतिदक्षता विभाग तयार केला आहे. या विभागातही दोन सिपॅप मशिन उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कोविडच्या आजाराने श्वास घेण्यास अडचण निर्माण झालेल्या बालकांनाही या मशिनचा उपयोग होणार असल्याचे जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्‍ज्ञ डॉ. अरुंधती कदम यांनी सांगितले.

Web Title: Ventilators For Newborns Too Three Sipap Machines Available At Satara District Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..