esakal | निवडणूकांसाठी आम्ही सज्ज आहाेतच, पुढचं आदेशावर ठरवू; 'महाविकास'च्या नेत्यांची भुमिका
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूकांसाठी आम्ही सज्ज आहाेतच, पुढचं आदेशावर ठरवू; 'महाविकास'च्या नेत्यांची भुमिका

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यापासून येथील ग्रामपंचायतीत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दोन गटांतच लढती पाहायला मिळतात. त्यामध्ये आमदारांचा हस्तक्षेप चालत नाही.

निवडणूकांसाठी आम्ही सज्ज आहाेतच, पुढचं आदेशावर ठरवू; 'महाविकास'च्या नेत्यांची भुमिका

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे; पण जिल्ह्यात प्राबल्य असताना स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यास राष्ट्रवादीचे पुढारी सहमत होणार का, हा प्रश्‍न आहे. आजपर्यंत गावपातळीवर स्थानिक नेत्यांच्या दोन गटांतच निवडणूक होत होती. त्यामुळे हे गट शिवसेना व कॉंग्रेसच्या नेत्यांना पॅनेलमध्ये सामावून घेणार का, याची उत्सुकता आहे.
या तालुक्यात प्रमुख ग्रामपंचायती काबीज करण्यासाठी नेते आग्रही असतात
 
ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता गावोगावी पॅनेल करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गटतटातच निवडणूक होते. त्यामुळे त्याला पक्षीय रंग कधीच चढत नाही; पण यावेळेस राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. त्यामुळे हा महाविकास आघाडीचा प्रयोग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राबविण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यापासून येथील ग्रामपंचायतीत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दोन गटांतच लढती पाहायला मिळतात. त्यामध्ये आमदारांचा हस्तक्षेप चालत नाही; पण राष्ट्रवादीची ही स्थानिक पातळीवरील ताकद या निवडणुकीतही पाहायला मिळणार असली, तरी काही ग्रामपंचायतीत भाजपनेही यापूर्वीच ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस ग्रामपंचायत पातळीवर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यास राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मान्य करणार का, प्रश्‍न महत्त्वाचा आहे.

मायणीत राजकीय गटातील स्पर्धा टळली
 
बहुतांश गावात राष्ट्रवादीच्या गटतटातील कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे, तर काही ठिकाणी कॉंग्रेस, शिवसेना व भाजपची ताकद आहे. यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बाजूला ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला स्थानिक पातळीवर राबविला गेल्यास आघाडील घटक पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना या माध्यमातून सत्तेत सहभागी होता येणार आहे; पण त्यासाठी कॉंग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची मनधरणी करावी लागणार आहे. यापूर्वी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते एकत्र येऊन गावपातळीवर पॅनेल करत होते. त्या वेळी भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते विरोधकांच्या भूमिकेत पाहायला मिळायचे; पण यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या पॅनेलमध्ये संधी देण्याबाबत विचार करावा लागणार आहे. हे कितपत शक्‍य होणार यावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला गावपातळीवर यशस्वी होण्याचे गणित अवलंबून आहे. 


जिल्ह्यात राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवर वर्चस्व आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ग्रामपंचायत पातळीवर राबविताना काही ठिकाणी अडचणी येणार आहेत. प्रदेशाध्यक्षांकडून अद्याप कार्यकर्त्यांना तसे आदेश मिळालेले नाहीत. याबाबत पक्षीय पातळीवर काय धोरण काय ठरतेय, त्यावर सर्व अवलंबून आहे. 

- सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 


ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे मतभेद विसरून तिन्ही पक्षांच्या इच्छुकांना पॅनेलमध्ये सहभागी करावे. आघाडीच्या माध्यमातून लढल्यास स्थानिक पातळीवर ताकद वाढू शकेल. 

डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 


ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने शाखा स्थापने, सभासद नोंदणीच्या माध्यमातून यापूर्वी तयारी केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज आहे. आता महाविकासचा फॉर्म्युला राबविण्याबाबत पक्षप्रमुखांचा जो आदेश येईल, त्या पद्धतीने वाटचाल केली जाईल. 

- प्रा. नितीन बनुगडे पाटील, शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख 

Edited By : Siddharth Latkar