पोलिसांना सहकार्य न केल्यास कठोर कारवाई; सहायक पोलिस निरीक्षक घोडकेंचा इशारा

सलीम आत्तार
Friday, 30 October 2020

सोमवारपासून (ता. 2) सर्व दुकानांची तपासणी होणार आहे. ज्या दुकानांच्या बाहेर कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसेल त्या दुकानदारांना दुकाने उघडता येणार नाहीत, तसेच त्याबाबत सहकार्य न केल्यास गुन्हा नोंद करण्याबाबत सूचना आहेत. सर्व व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी केले.

पुसेगाव (जि. सातारा) : पुसेगाव पोलिस ठाण्यात झालेल्या ग्रामस्तरीय समितीच्या बैठकीत येथील सर्व व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्यानुसार अनेक व्यावसायिकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला. 

पुसेगाव येथे मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठेतील व्यावसायिक हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर असल्याचे आजूबाजूच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या तपासणी अहवालानुसार दिसून आले आहे. त्यामुळे मोठ्या बाजारपेठेतील व्यापारी वर्गाच्या कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येथील पोलिस ठाण्यात व्यापारी संघटना व ग्रामस्तरीय समितीची संयुक्त बैठक झाली. व्यापाऱ्यांसह व दुकानातील कामगारांची कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे, असे यावेळी सांगण्यात आले. 

सातारा जिल्ह्यात 275 नागरिकांना घरी सोडण्यात आले तर 464 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले

सोमवारपासून (ता. 2) सर्व दुकानांची तपासणी होणार आहे. ज्या दुकानांच्या बाहेर कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसेल त्या दुकानदारांना दुकाने उघडता येणार नाहीत, तसेच त्याबाबत सहकार्य न केल्यास गुन्हा नोंद करण्याबाबत सूचना आहेत. सर्व व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन घोडके यांनी केले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गुजर, मंडलाधिकारी विठ्ठल तोरडमल, तलाठी गणेश बोबडे, ग्रामसेवक नाळे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, प्रा. केशव जाधव उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village level Committee Meeting At Pusegaon Police Station Satara News