
"आमच्या लहानपणी अशीच परिस्थिती होती' असे बोल वृद्धांकडून ऐकायला मिळत आहेत. नदी, नाले कायम वाहायचे. त्यामुळे पोहोण्याचा आनंद कसा घेता यायचा तिथपासून नदीत मासे धरून मित्रांनी केलेल्या पार्ट्यांच्या किस्यांना आता उजाळा मिळू लागला आहे.
गोंदवले (जि. सातारा) : पाऊस थांबल्यानंतर नदी नाल्यांना खळाळणारे पाणी... नदीकडेच्या खडकांवर कपडे धुण्यासाठी आयाबायांची लगबग... वाहत्या नदीत आणि तुडुंब भरलेल्या विहिरीत पोहताना मारलेला सूर... गळ आणि जाळ्यात पकडलेल्या माशांच्या रस्याचा फुरका... हे दिवस आता पुन्हा अनुभवायला मिळत असल्याने माणमधील गावे आता भूतकाळात जगू लागली आहेत. आधुनिकतेच्या काळात गावाचे गावपण यानिमित्ताने पुन्हा बहरू लागले आहे.
भौगोलिक परिस्थिती, निसर्गचक्राचा लहरीपणा व वातावरणात होत असलेले बदल यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाचे ओझे वाहणारा अशीच माणची ओळख कायम झाली. बोडके डोंगर, कोरडेठाक नदी-नाले, ओसाड माळरान आणि पाण्यासाठीचा टाहो हे चित्र नेहमीच या भागात पाहायला मिळते. अलीकडच्या दोन वर्षांत मात्र हे चित्र काहीसे धूसर बनत चालले आहे. यंदाच्या पावसामुळे तर माण तालुक्याची संपूर्ण परिस्थितीच बदलून गेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसरातील सर्वच नद्या, नाले खळाळून वाहत आहेत, तर विहिरी तोंडाला आल्या आहेत. बंधारे, तलाव, लहान-मोठे जलसाठे गच्च भरून वाहत आहेत. अनेक वर्षांनंतर बदललेली ही परिस्थिती लोकांना भूतकाळात घेऊन जात आहे.
जोतिबा रुपातील सिध्दनाथांची आकर्षक पूजा; मनमोहक रुपाने वेधले लक्ष
"आमच्या लहानपणी अशीच परिस्थिती होती' असे बोल वृद्धांकडून ऐकायला मिळत आहेत. नदी, नाले कायम वाहायचे. त्यामुळे पोहोण्याचा आनंद कसा घेता यायचा तिथपासून नदीत मासे धरून मित्रांनी केलेल्या पार्ट्यांच्या किस्यांना आता उजाळा मिळू लागला आहे. याची आठवणी सध्या पुन्हा अनुभवायला मिळत आहेत. खळाळणाऱ्या वाहत्या पाण्यात महिलांची कपडे धुण्यासाठी तर आबालवृद्धांची पोहण्यासाठी गर्दी होत आहे. मासेमारीसाठी गळ आणि जाळे टाकले जात असून, गरम रस्स्यावर ताव मारला जात आहे. शेतकरीवर्ग देखील नदी नाल्याच्या मुबलक पाण्यात जनावरांना यथेच्छ अंघोळ घालण्याचा आनंद घेत आहेत. एकूणच अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बदललेल्या निसर्गाचा आनंद गावकरी अनुभवत आहेत. परिणामी, आधुनिकतेच्या वाटेवरची गावे सध्या प्रत्यक्षात भूतकाळ जगू लागल्याचेच चित्र आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे