सातारा : पती, पत्नी, मुलीच्या मृत्यूने वडगाव हादरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jagtap familty

सातारा : पती, पत्नी, मुलीच्या मृत्यूने वडगाव हादरले

कऱ्हाड - वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील पती-पत्नीसह चिमुकलीचा ओरिसातील भुवनेश्वरला मृत्यू झाला. संबंधितांचे मृतदेह काल रात्री गावी आणल्यानंतर ते ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार देऊन जमावाने काल रात्री मृतदेहांसह रुग्णवाहिका तालुका पोलिस ठाण्यासमोर आणली. तेथे ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी जमावाशी चर्चा करून नातेवाइकांचा तक्रार अर्ज घेतल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले. तुषार राजेंद्र जगताप (वय २६), पत्नी नेहा तुषार जगताप (वय २१) व मुलगी शिवन्या तुषार जगताप (वय दीड वर्षे, सर्व रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भुवनेश्वर पोलिसांत खुनाचा, आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांची माहिती अशी, वडगाव हवेली येथील तुषार जगताप हा युवक ओरिसातील भुवनेश्वरला पत्नी नेहा व मुलगी शिवन्या यांच्यासह राहात होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी तिघांचेही मृतदेह आढळून आले. याची नोंद तेथील पोलिसात झाली आहे. भुवनेश्वर येथे मृताची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिघांचेही मृतदेह रुग्णवाहिकेतून वडगाव हवेली येथे त्यांच्या गावी आणण्यात आले. येथे आल्यानंतर नातेवाइकांना त्यांचे मृत्यू हे संशयास्पद असून, घातपात झाल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे गावी मोठा जमाव जमला. त्यानंतर जमावाने मृतदेहांसह रुग्णवाहिका तालुका पोलिस ठाण्यात आणली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व आक्रमक झालेला जमाव पाहून पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील हे त्वरित पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी जमावाबरोबर चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांचा तक्रार अर्ज घेतल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतले. पहाटेच्या सुमारास वडगाव हवेली येथे पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले.