न्यायालयाच्या आदेशानंतर "गर्ल्स हायस्कूल' पाडणा-यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

भद्रेश भाटे
Tuesday, 23 February 2021

पोलिसांनी संबंधितावर सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य जबरजस्तीने, दमदाटी व शिवीगाळ करून चोरून नेल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करीत आहेत.

वाई (जि. सातारा) : येथील रविवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या "गर्ल्स हायस्कूल' या शाळेची इमारत पाडल्याप्रकरणी वाई ब्राह्मो समाज मंडळाच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र साबळे व त्यांचे पती राजेंद्र साबळे यांच्यासह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाई न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 19) संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
 
रविवार पेठ येथील सिटी सर्व्हे नंबर 1486 ही इमारत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने मुलींच्या शाळेकरिता वाई ब्राह्मो समाज मंडळाकडून भाडेतत्त्वावर घेतली आहे. या इमारतीत अनेक वर्षांपासून गर्ल्स हायस्कूल चालविले जात आहे. मात्र, रविवारी (ता. 14) ब्राह्मो समाज मंडळाच्या अध्यक्षा मीनल साबळे व त्यांचे पती राजेंद्र साबळे यांनी पालिका प्रशासनाकडून शाळेची इमारत धोकादायक असल्याचे पत्र मिळवून सुटीदिवशी शाळेच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अन्य सात ते आठ जणांच्या मदतीने इमारत पाडण्याचे काम हाती घेतले. याच दरम्यान शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रेखा हरिश्‍चंद्र ठोंबरे व त्याचे पती शाळेच्या समोरून जात होते. त्यांना शाळेचे कुलूप तोडल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी आत प्रवेश केला. त्या वेळी त्यांना साबळे पती- पत्नी व अन्य सात ते आठ जण शैक्षणिक साहित्य ट्रॅक्‍टरमध्ये भरत असल्याचे दिसून आले. त्याबाबत विचारणा केली असता साबळे यांनी ठोंबरे व त्यांच्या पतींना रोखून धरले. अन्य सात ते आठ जणांनी शाळेचे 10 संगणक, 1 प्रिंटर, लाकडी टेबल, खुर्च्या, महत्त्वाची कागदपत्रे, शाळेचे रेकॉर्ड आदी शैक्षणिक साहित्य जबरदस्तीने चोरून नेले. त्यानंतर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ठोंबरे पती-पत्नी त्यांच्या तावडीतून पळून गेले. याबाबतची माहिती संस्थेचे सहसचिव राजेंद्र शेजवळ यांना दिली. त्यानंतर मुख्याध्यापिका ठोंबरे या वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या. मात्र, त्या वेळी पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. उलट त्यांना पोलिस ठाण्यातून हाकलून दिले. 

त्यामुळे नंतर संस्थेच्या वतीने प्रभारी मुख्याध्यापिका ठोंबरे यांनी वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फोजदारी स्वरूपाचा दावा दाखल केला. याकामी ऍड. महेश शिंदे यांनी सहकार्य केले. याबाबत न्यायालयाने ता. 16 रोजी मीनल साबळे, राजेंद्र साबळे व अन्य सात- आठ अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश वाई पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी संबंधितावर सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य जबरजस्तीने, दमदाटी व शिवीगाळ करून चोरून नेल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करीत आहेत.

महाराष्ट्रातील मावळ्याने आफ्रिकेतील शिखरावर फडकावला तिरंगा

महिलांनो! तुमच्या शरीरातील हे 10 बदल High Estrogen Symptoms चे आहेत संकेत!

काय बाई सांगू, कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज!

भारतीयांच्या गळ्यातील ताईत हिमा दास आता बनणार डीएसपी

अन्याय करणा-यांना धडा शिकवा : राजमाता कल्पनाराजे भाेसले

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wai Police Registered Case Against Bramho Samaj Mandal Directors Satara Marathi News