
- गिरीश चव्हाण
सातारा : सातारा शहरातील पाणी योजनेचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, या कामातील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठीच्या उपाययोजना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून राबविण्यात येत आहेत. या कामादरम्यान नळजोडण्यांची तपासणी करण्यात येत असून, यात सुमारे ४०० नळजोड विनापरवानगी घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या पाणीचोरांना त्याबाबतच्या नोटिसा पालिकेने बजावल्या आहेत. नोटिशीतील मुदतीत नळजोड नियमित करून न घेतल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठीची तयारी देखील पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील तपासणीत चारशे नळजोड विनापरवाना आढळल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने अत्यंत सखोल तपासणी करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.