
Water Scarcity : कऱ्हाडकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार
कऱ्हाड : शहराला पालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कऱ्हाडकरांना कृत्रिम पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे. सार्वजनिक नळ पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचे दोन महिन्यांचे ४० लाखांचे बिल थकीत आहे. वीज कंपनीने मागणी करूनही पालिकेने निधी नसल्याने ती बिले अदा केलेले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन वीज कंपनी कधीही तोडू शकते.
शहरात पालिकेतर्फे रोज १३ हजार ८७ नळ कनेक्शनधारकांना पाणीपुरवठा होतो. त्यात शहराच्या हद्दीतील ११ हजार ९९२, तर एक हजार ९५ नळ कनेक्शन शहराबाहेर आहेत. त्यासाठी कोयनेतून पाणी उचलून नऊ टाक्या भरल्या जातात.
त्यानंतर ते पाणी वितरित केले जाते. त्यासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाणी उचलून ते वितरित करण्यासाठी सहा कोटी ६६ लाख चार हजारांचा खर्च येतो. त्या खर्चात तीन कोटी ३३ लाख ७२ हजारांची तफावत राहते आहे. त्यामुळे योजना तोट्यात आहे.
एकूण खर्चापोटी केवळ तीन कोटी ३२ लाख ३१ हजारांचीच वसुली होत असल्याने जी तफावत राहते आहे, ती तोट्यात धरली जात आहे. ती भरून काढण्यासाठी पालिकेने वेगवेगळे प्रयोग केले. मात्र, अपेक्षित यश येताना दिसत नाही.
पाणीपट्टी वाढवूनही विरोध वाढतो आहे, तर मीटरप्रमाणे आकारणी सध्या गाजत आहे. त्या विरोधात तक्रारी झाल्याने तो प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्याने त्याला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल मागवला आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल.
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याने नव्याने तीन कोटी २९ लाख ५० हजारांची वसुली थांबली आहे. मात्र, त्याचा आडोसा घेत जुन्या थकीत मिळकतधारकांनीही हात वर केल्याने दोन कोटी ८८ लाखांची वसुलीही रखडली आहे.
परिणामी पालिकेकडे निधीची कमतरता जाणवते आहे. शहरासह हद्दवाढ व शहरालगतच्या उपनगरात पाणीपुरवठ्यासाठी पालिकेला प्रती महिना २० लाखांचे वीजबिल भरावे लागते. मात्र, दोन महिन्यापासून पालिकेने वीजबिल भरलेले नसल्याने पालिका वीज कंपनीचे ४० लाखांचे देणे बाकी आहे.
वीज कंपनीने वारंवार मागणी करूनही निधीअभावी वीजबिल भरता आलेले नसल्याने कोणत्याही क्षणी वीज कनेक्शन वीज कंपनी तोडण्याच्या तयारीत आहे. वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्यास कऱ्हाडकरांना कृत्रिम पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागणार आहे. ती टाळण्याचे नियोजनही पालिका त्यांच्या स्तरावर करत असली, तरी तेही नियोजन फेल ठरल्याचेच दिसते.
मिळकतधारकांनी तब्बल दोन कोटी ८८ लाखांची थकीत पाणीपट्टी भरल्यास वीज कंपनीचे बिल अदा करून पाणीपुरवठा सुरळीत राहू शकतो. नव्या पाणीपट्टीला तात्पुरती स्थगिती आहे. त्याचा निर्णय जिल्हाधिकारी देतील. मात्र, जुन्या थकीत पाणीपट्टीची बिल नागरिकांनी भरून पालिकेस सहकार्य करावे.
- रमाकांत डाके, मुख्याधिकारी तथा प्रशासक