कोरोनाप्रश्‍नी हलगर्जीपणा केल्यास कारवाई ः मकरंद पाटील

Satara
Satara

महाबळेश्वर (जि. सातारा) : आपल्या तालुक्‍यात आता कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुढील आठ दिवस ही स्थिती अशीच राहणार आहे. तेव्हा येथील कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क व जबाबदारीने राहिले पाहिजे. कामातील दुर्लक्ष व हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा निदर्शनास आला तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार मकरंद पाटील यांनी तालुका आढावा बैठकीत दिला. या वेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर उपस्थित होत्या. 

महाबळेश्वर तालुक्‍यात गेले चार दिवस कोरोना झालेले रुग्ण आढळून येत असून, रुग्णांची संख्या रोज वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहात महाबळेश्वर तालुका आढावा बैठक घेतली. या बैठकीला प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी अजित कदम, पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी आदींसह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांतून महाबळेश्वर तालुक्‍यात आजअखेर साडेपाच हजारांपेक्षा अधिक लोक आले आहेत. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आजअखेर महाबळेश्वर येथे 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच हायरिस्क व लोरिस्क असे एकूण 78 लोकांना तळदेव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकीच कोरोना रुग्ण आढळून येत आहेत म्हणून या केंद्रावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रातील सर्वांचे स्वॅब टप्प्याटप्प्याने टेस्टिंगसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामासाठी तालुक्‍याला रुग्णवाहिका कमी पडत आहेत, याची व्यवस्था होणे गरजेची आहे. महाबळेश्वर पालिकेकडील रुग्णवाहिका या कामासाठी उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार पाटील यांनी पालिकेला केली आहे. तालुक्‍यात महाबळेश्वर पालिकेकडे शववाहिनी आहे. परंतु, यापेक्षा अधिक शववाहिनीची आवश्‍यक्ता लागेल, अशी मागणीही तहसीलदार यांनी या बैठकीत केली. 

बेल एअर पाचगणी येथे 100 बेडचे कोरोना केअर सेंटर तयार करण्याची सूचना आमदार पाटील यांनी या बैठकीत केली. बेड व काही व्हेंटिलेटरची व्यवस्थाही करण्याची सूचना प्रशासनास करण्यात आली. भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासनाने 31 डॉक्‍टरांची टीम तयार केली आहे. यापैकी तीन-तीन डॉक्‍टर हे तीन पाळ्यांमध्ये काम करतील. पहिले सात दिवस काम केल्यानंतर डॉक्‍टरांना एका हॉटेलमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर सात दिवस त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सर्व डॉक्‍टरांना 14 दिवसांची विश्रांती मिळाल्यानंतर पुन्हा सात दिवस त्यांना कामावर घेण्यात येणार आहे. 
बैठकीला बाळासाहेब भिलारे, डी. एम. बावळेकर, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, अफजल सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक संजय पिसाळ यांनी आभार मानले. 


"त्यांच्या'कडे तुच्छतेने पाहू नका 

जे रुग्ण आज आढळून येत आहेत, ते सर्व मुंबईकर आहेत. परंतु, त्यांनी कोरोना कोणाला मागून घेतलेला नाही. त्यांच्या गावाला हक्काचे घर आहे म्हणून ते येथे येत आहेत म्हणून त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नका. तीही आपल्यातीलच माणसे आहेत. आज त्यांना झाला, उद्या आपल्याही होऊ शकतो, याचे भान ठेवा. प्रत्येकाने सद्‌सद्विवेकबुद्धीने वागा. कोरोनाबाधितांना तुमची साथ मिळाली तर त्यांचाही आत्मविश्वास वाढेल आणि ते कोरोनाचा पराभव करून आपल्यात येतील, असे आवाहनही आमदार पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com