
तरडगाव : आळजापूर (ता. फलटण) येथील बार बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार उभी बाटली आडवी करण्यासाठी आज महसूल विभागाने मतदान प्रक्रिया राबविली. त्यामध्ये ७२३ महिला मतदारांपैकी ४८० महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ४५४ महिलांनी आडव्या बाटलीसाठी कौल देत दारूबंदीच्या निर्धाराला यशाचे बळ दिले. उभ्या बाटलीच्या बाजूने १९ मतदान झाले, तर सात मते बाद झाली. या निकालानंतर समस्त आळजापूर ग्रामस्थ, महिलांनी जल्लोष केला.