'प्रतापगड'च्या गळीतास कामगारांचा विरोध; आक्रमक पवित्र्याने कारखाना प्रशासनाला जाग येणार?

महेश बारटक्के
Sunday, 22 November 2020

जावळी तालुक्‍यातील सहकारी तत्त्वावरील एकमेव प्रकल्प असलेल्या प्रतापगड साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन समारंभावेळीच कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत कारखाना सुरू करू न देण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या गळीत हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यातील सहकारी तत्त्वावरील एकमेव प्रकल्प असलेल्या प्रतापगड साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन समारंभावेळीच कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत कारखाना सुरू करू न देण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या गळीत हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामगारांनी आपल्या विविध मागण्यांबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. 

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रतापगड सहकारी साखर कारखाना सन 2012-13 पासून किसन वीर सहकारी साखर कारखाना, भुईज यांना 16 वर्षांकरिता भागीदारी तत्त्वावर त्रिपक्षीय कराराने चालविण्यास दिलेला आहे. करार कालावधीमध्ये कामगारांना पगार देणे, कामगारांना बोनस देणे, पीएफ रक्कम भरणे ही सर्व जबाबदारी किसन वीर कारखान्याची आहे, तरीसुद्धा नोव्हेंबर 2019 पासून आजअखेर कामगारांचे पगार दिलेले नाहीत. सप्टेंबर 2019 पासून पीएफ भरलेला नाही. मागील तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिलेला नाही. त्याप्रमाणे शासनाच्या त्रिपक्षीय कराराची 15 टक्के वेतनवाढीची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही. संपूर्ण देशावर कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीतही किसन वीर कारखान्याने कर्मचाऱ्यांना कोणतीच आर्थिक मदत न करता वाऱ्यावर सोडले. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

पदवीधरांच्या बेकारीला भाजपच जबाबदार : जयंत पाटील

कोणतीही देणी न देता काम सुरू करण्यासाठी वेगळ्या शक्तीचा वापर करून दबाब आणत आहेत. अशाप्रकारची नेहमीच अन्यायकारक वागणूक देत आहेत. देणी व आमचे प्रश्न मार्गी न लावल्यास आम्ही सर्व कामगार वर्ग कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या हंगामात कारखाना सुरू होऊ देणार नाही. काल अचानकपणे किसन वीर कारखान्याने कामगारांना व व्यवस्थापनास विश्वासात न घेता परस्पर बॉयलर प्रदीपन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास आम्ही प्रखर विरोध केला व यापुढेही करणार आहोत, असेही या वेळी कामगारांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. बॉयलर प्रदीपन वेळीच कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने यंदाच्या हंगाम गळिताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मंत्र्यांनीसुद्धा घरुनच विठूरायाची पूजा करावी; अक्षयमहाराजांचा उपमुख्यमंत्र्यांना इशारा

प्रतापगड कारखान्याचा मागील हंगामही बंद होता. या वेळी तो सुरू व्हावा, ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, कामगारांच्या मानसिकतेचा व त्यांच्या सहनशीलतेचाही विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकरी व कामगार हे दोन मुख्य घटक असल्याने दोघांनाही दुखवता येणार नाही. हंगाम सुरू करण्यासाठी प्रतापगड व किसन वीरच्या प्रशासनाने कामगारांना विश्वासात घेऊन योग्य तो तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. 
-दादा पाटील, उपाध्यक्ष, प्रतापगड कारखाना

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers Oppose Start Of Pratapgad Sugar Factory Satara News