
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषि औद्योगिक रचनेचे निर्माते, मर्मज्ञ रसिक, आस्वादक समीक्षक, उत्तम संघटक आणि प्रशासक म्हणून यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते. साहित्यिक, राजकारणी, रसिक, वक्तृत्वपट्टू असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व काळाच्या आणि परिस्थितीच्या मुशीतून घडत गेले. त्यांनी आपले व्यक्तिमत्व जाणीवपूर्वक घडविले आहे. लहानपणापासून त्यांच्यावर वाङ्मयीन संस्कार झाले होते. आईने म्हटलेल्या ओव्या, तिच्याबरोबर ऐकलेली कथाकीर्तने, प्रवचने, पौराणिक आख्याने इत्यादीतून त्यांचे शब्दभान आणि भाषाज्ञान सतर्क झाले. देवराष्ट्रेजवळील निसर्गरम्य परिसर आणि कराडमधील विविध चळवळी, व्याख्याने यांतून त्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्वाला पोषक वातावरण मिळाले. त्यांच्यावरच्या खोलवर वाङ्मीन संस्कारामुळेच ते ललित लेखक झाले. त्यांनी विविध अनुभव घेऊन प्रत्ययकारी शैलीत उपमा, प्रतिमा आणि लालित्याद्वारे वाङ्मय निर्मिती केली. भाषेवर मनापासून प्रेम केले आणि साहित्याविषयी चोखंदळ जाणकारी बाळगली. त्यांनी विपुल प्रमाणात वाचन केले. वाचनातून मनात साठवून ठेवलेले वाङ्मयीन कलाकृर्तीचे संदर्भ ते लेखन आणि भाषणातून आविष्कृत करत. ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय शिल्पकार होते; तसे नव्या-नव्या शब्दांचे आणि कल्पनांचे शिल्पकार होते. म्हणून अचूक शब्द वापरून ते कोणत्याही विषयाला योग्य न्याय देत.
- डॉ. प्रकाश दुकळे