सातारा जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

सातारा जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा नारा

सातारा : जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सात सदस्य निवडून आणून जिल्हा परिषदेत पाय रोवले. आता वाढलेले दहा गट व २० गणांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्वच ठिकाणी लढण्याची तयारी सुरू केली आहे. इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून यावेळची निवडणूक सोपी करण्याची त्यांची रणनीती आहे. जिल्ह्यात विस्कळित असलेली महाविकास आघाडी लक्षात घेता भाजपचे स्वबळ व पक्षाच्या चिन्हावर लढण्याचे मनसुबे जिल्ह्यात यशस्वी होणार का, याची उत्सुकता आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत येत्या २१ मार्चला संपत आहे. यावेळेस वाढलेले गट, गणांची संख्या व पुनर्रचनेचा फायदा घेण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षानेही आघाडी घेतलेली आहे. सध्या पाटण व कऱ्हाड उत्तर वगळता उर्वरित ठिकाणी भाजपची चांगली ताकद आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी अनेकांनी भाजपमध्ये उड्या मारल्या. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या मदतीने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्‍या निवडणुकाही जिल्हा परिषदेत ताकद वाढविण्याचा अजेंडा भाजपचा आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात भाजपची महत्त्‍वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामध्ये या निवडणुकीची रणनीती ठरणार आहे.

जिल्हा परिषदेत भाजपचे चिन्हावर निवडून आलेले सात सदस्य आहेत. ही सदस्यसंख्या आगामी निवडणुकीत वाढविण्यासाठी भाजपकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिग्गज नेत्यांच्या ताकदीचा उपयोग करून घेतला जाणार आहे. पण, सातारा तालुक्यात सध्या जे सदस्य आहेत, ते मूळचे राष्ट्रवादीचे आहेत. पण, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये असल्याने या वेळेस भाजपच्या चिन्हावर लढण्याचे मनसुबे सातारा व जावळी मतदारसंघात यशस्वी होणार का, याची उत्सुकता आहे.

पाटण व कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपची ताकद कमी आहे. त्यामुळे पाटणमध्ये दोन गट व कऱ्हाड उत्तरमध्ये काही गटांत भाजपकडून चाचपणी सुरू आहे. उर्वरित सर्व मतदारसंघांत भाजपची ताकद आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगवेगळे लढणार असल्याने त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. त्यानुसार भाजपने सर्वच गटांत उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीतील पक्षांबरोबरच खरी लढत

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजपने मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. आता त्यांना जास्तीत जास्त सदस्य निवडून आणून जिल्हा परिषदेत किमान तुल्यबळ विरोधकाची भूमिका बजवायची आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत यापूर्वीच्या निवडणुकीत निर्माण झालेल्‍या हेवेदाव्याचा फायदाही भाजप उठवू शकते. त्यामुळे भाजपला राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांशी लढत द्यावी लागणार आहे.

येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकां-साठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. आम्ही यावेळेस सर्व गटांवर लक्ष केंद्रित केले असून, स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावरच आम्ही लढणार आहोत.

- विक्रम पावसकर,जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष