विजेवरील वाहने काळाची गरज

विजेवरील वाहने काळाची गरज

सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत गाड्यांच्या आकारात वेळोवेळी बदल होत गेले. ते आता अत्याधुनिक, आकर्षक रूपापर्यंत पोचले आहे. ही सुमारे ३०० वर्षांची उत्क्रांती आहे. पहिल्या गाडीला समोर ना संरक्षक काच होती ना दरवाजे. आजच्या गोल स्टिअरिंग व्हीलऐवजी दोन्ही बाजूला स्टिअरिंग होते. तेव्हापासून गाडीत सुरक्षा, सुविधा, आराम आणि शैलीच्या दृष्टीने अनेक वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करण्याच्या प्रयत्नांचा प्रवास सुरू झाला. एकेकाळी केवळ उपयुक्ततेच्या भावनेतून तयार करण्यात आलेली गाडी आज आपल्या जीवनशैलीचे परिमाण बनली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर बदल होत आता विजेवरील वाहनांची म्हणजे इलेक्‍ट्रिक व्हेईकल्सची (ईव्ही) भर पडली आहे.

विजेवरील वाहनांचा प्रवास आजची गरज असली तरी त्याची सुरुवात १९४७ मध्येच झाल्याची नोंद आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ९६ कि.मी.पर्यंतचा प्रवास करण्याची क्षमता असलेल्या या ‘टामा’ गाड्यांमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने तेलटंचाईशी युद्ध जिंकले. आज ‘ईव्ही’चा स्वीकार करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने जागतिक तापमानवाढीच्या (ग्लोबल वॉर्मिंग) संदर्भात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर ‘ईव्हीं’च्या विक्रीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

या वाढीला हातभार लावण्याचे काम निसान लीफ या मॉडेलसह, टाटा, टेस्ला, महिंद्रा आदी कंपन्या करत आहेत. सर्वाधिक सक्षम असे इलेक्‍ट्रिक वाहन तयार करण्यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्नशील आहे. पारंपरिक इंधन असलेल्या गाडीऐवजी संपूर्ण इलेक्‍ट्रिक वाहनाचा स्वीकार करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी गाडी तयार करण्याचे मोठे आव्हान कंपन्यांसमोर आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत त्याला काही प्रमाणात यश येताना दिसते आहे. काही गाड्यांमध्ये गॅस इंजिन बसवण्यात येत आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रिक बॅटरी चार्ज करणे अतिशय सोपे झाले आहे. यात अधिक अंतर कापण्याची क्षमता, सर्वोच्च सरासरी, कुठलाही तणाव न घेता वाहन चालवण्याची मोकळीक आणि जागतिक दर्जाची तंत्रज्ञानी वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच जगभरातील ग्राहकांना ‘ईव्ही’ खरेदी करण्याची प्रेरणा मिळत आहे.

गाड्या आणि गाड्यांची बाजारपेठ या दोन्ही गोष्टी आता प्रगल्भ झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गाड्यांच्या इतिहासात विजेवरील वाहने हा आजवरचा सर्वात मोठा बदल आहे. बॅटरी स्टोरेज असलेल्या या गाड्यांमुळे इंधनाचे गतीत परावर्तन करणारी इंटर्नल कंबशन इंजिन (आयसीई) इतिहासजमा होणार आहेत. या गाड्यांच्या इलेक्‍ट्रिक मोटरमध्ये आयसीईच्या तुलनेत किमान १०० पट कमी हलणारे (२० पेक्षा कमी) भाग आहेत. त्यामुळे झीज होण्याचे प्रमाण खूप कमी होते. एका अंदाजानुसार या गाड्यांचा मालकीखर्च एकतृतियांशपर्यंत कमी होऊ शकतो.

शून्य उत्सर्जन भविष्यासाठीचे इंधन

किंमत हा निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाचा मुद्दा असला, तरी पर्यावरणाविषयी संवेदनशील असलेले ग्राहक हवेतील प्रदूषण आणि ओझोनच्या थरावर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी या गाड्यांच्या असलेल्या फायद्याला निश्‍चितच महत्त्व देतील. ‘ईव्हीं’च्या सध्याच्या किमतीत ईव्ही स्टोअरेज बॅटरींची किंमत हा महत्त्वाचा घटक आहे. या बॅटरींची किंमत प्रतिवर्षी सरासरी २० टक्‍क्‍यांनी कमी होत आहे. सध्या हे दर आजवरच्या नीचांकी पातळीवर असून त्यात घट होतच आहे. त्यामुळे येत्या तीन-चार वर्षांत इलेक्‍ट्रिक गाड्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या स्वस्त होतील आणि त्यांच्या वापरखर्चातही खूप घट होईल. सध्या उपलब्ध असलेल्या ‘ईव्ही’ एकदा चार्ज केल्यावर २४३ कि.मी.पर्यंत धावू शकतात. बॅटरींच्या वाढत्या क्षमतेमुळे ही सरासरी अंतरक्षमताही वाढत आहे.

भविष्यातील आव्हाने

बॅटरी तंत्रज्ञानात होत जाणाऱ्या प्रगतीमुळे सरासरी अंतर कापण्याची क्षमता आणि किंमत याबाबतची चिंता कमी झाली तरी इतरही काही अडथळे आहेत. यात प्रामुख्याने चार्जिंगचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आजमितीस भारतात पारंपरिक इंधनाची ५६ हजार केंद्रे (पेट्रोल पंप इ.) आहेत. या तुलनेत ईव्हींसाठी आवश्‍यक असलेली अवघी २२२ कम्युनिटी चार्जिंग स्टेशन्स आहेत. एखाद्याच्या घरी ही गाडी चार्ज करायचे म्हटले तर वीजवापराचा खर्च किती असेल, हा प्रश्न उपस्थित होतो.

ही सर्व आव्हाने एक प्रकारे छुप्या संधीच आहेत. ‘ईव्ही’मार्फत दळणवळणावर सरकारने ज्या प्रकारे भर दिला आहे, त्याने वाहन उद्योग, धोरणकर्ते, ऊर्जा क्षेत्र आणि अन्य अनेक भागधारकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. क्रुड तेलासाठी वर्षाकाठी एक लाख कोटी रुपये खर्च करणाऱ्या देशात सौर ऊर्जेच्या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे अधिक शाश्वतरीत्या उत्पादित होऊ शकणाऱ्या आणि रस्त्यावर शून्य उत्सर्जनाचा त्रास असलेल्या विजेचा इंधन म्हणून वापर करणे यातच अधिक समंजसपणा आहे.

(लेखक निसान इंडियाचे उपाध्यक्ष आणि उत्पादनप्रमुख आहेत.) 
अनुवाद : चंद्रकांत दडस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com