झुकेरबर्गचा 'कृत्रिम सहायक' 

व्यंकटेश कल्याणकर
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

जसजसे घड्याळातील काटे पुढे जात आहेत, तसतसे तंत्रज्ञानातील अद्‌भुत आविष्कार प्रत्यक्ष साकारत आहेत. या साऱ्यांचा हेतू माणसाचे जगणे समृद्ध व्हावे असा आहे. असाच एक नवा आविष्कार 'फेसबुक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी समोर आणला आहे. 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intellegance) वापरून 'फेसबुक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी स्वत:च्या घरातील दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी 'जार्विस' नावाचा कृत्रिम सहायक तयार केला आहे.

जसजसे घड्याळातील काटे पुढे जात आहेत, तसतसे तंत्रज्ञानातील अद्‌भुत आविष्कार प्रत्यक्ष साकारत आहेत. या साऱ्यांचा हेतू माणसाचे जगणे समृद्ध व्हावे असा आहे. असाच एक नवा आविष्कार 'फेसबुक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी समोर आणला आहे. 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intellegance) वापरून 'फेसबुक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी स्वत:च्या घरातील दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी 'जार्विस' नावाचा कृत्रिम सहायक तयार केला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता हे संगणकशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. मानवी बुद्धीप्रमाणे व परिस्थितीशी जुळवून घेत काम करणाऱ्या मशिनच्या निर्मितीसाठी त्या मशिनला सूचना, आज्ञा आणि मर्यादांबाबतची सविस्तर माहिती देण्यात येते. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता पुरविण्यात येते. 'जार्विस'च्या निर्मितीसाठी मार्क गेल्या वर्षापासून स्वत: संगणकीय प्रणालीचे (कोडिंग) काम करत होते. त्यापैकी काही यशस्वी प्रयोगांबद्दल त्यांनी 'फेसबुक'च्या वॉलवरून माहिती दिली आहे.

मार्कच्या घरातील अंगण, दिवाणखाणा, शयनकक्ष, स्वयंपाकघर आदी ठिकाणी 'जार्विस'चे अस्तिव आहे. वास्तविक 'जार्विस' म्हणजे मानवी आकारातील मशिन नसून घरातील वेगवेगळ्या ठिकाणांना, यंत्रांना, व्यवस्थांना परस्परांशी जोडून त्यामध्ये समन्वय साधणारी आणि त्या अनुषंगाने मार्क यांना सूचना देणारी एक प्रकारची संगणकीय प्रणाली आहे. काही पाहुणे किंवा मित्र घराच्या अंगणापर्यंत पोचलेले असताना, झुकेरबर्ग ज्या खोलीत बसले असतील, तेथील स्पीकरमधून 'जार्विस' त्या पाहुण्यांचे किंवा मित्राचे नाव सांगेल. त्यासाठी दारातील कॅमेरे आणि त्यामागे असलेली चेहरा ओळखण्याची संकेतावली (Face Recognition) वापरून ती माहिती आवाजाच्या स्वरूपात मार्कपर्यंत पोचवली जाईल. त्याचप्रमाणे घरातील प्रकाश यंत्रणा, म्युझिक सिस्टिम, वातानुकूलन यंत्रणा, ओव्हन आदी नित्योपयोगी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू कार्यान्वित आणि नियंत्रित करण्यासाठी 'जार्विस' मदत करत आहे. म्हणजे 'एसीचे तापमान 20 डिग्री कर' असा तोंडी आदेश दिल्यानंतर रूममधील मायक्रोफोनद्वारे किंवा स्मार्टफोनद्वारे सूचना ऐकून आवाज आणि त्यातील आज्ञा ओळखून 'जार्विस' त्याप्रमाणे कृती करेल.

अर्थात, अद्यापही या सहायकात काही त्रुटी आहेत आणि झुकेरबर्ग त्यावर काम करत आहेत. 'जार्विस' सध्या फक्त मार्कच्या घरात प्रायोगिक स्तरावर कार्यरत आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीचा आवाज ओळखून त्याप्रमाणे कृती करण्यासाठी प्रणाली तयार करणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. अर्थात, हे काम अशक्‍य नसल्याने अनेक प्रयत्नांनंतर या आव्हानावरही मात करता येईल. नवनिर्मिती, व्यवसायवृद्धी, कल्पकता आणि कर्तृत्व याच्याआधारे मार्क काही वर्षांत हा कृत्रिम सहायक मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून देईल. 

माणसाला कमीत कमी श्रमात अधिकाधिक कामे सहजपणे आणि सोपेपणाने करता यावीत, यासाठी यंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. स्मार्टफोनमुळे सध्या माणूस माणसापेक्षा मोबाईलच्या स्क्रीनला अधिक वेळा स्पर्श करत आहे. नव्या आविष्कारांमुळे एक दिवस माणूस माणसाशी बोलण्याऐवजी यंत्राशीच बोलू लागेल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामात यंत्रे मदत करतील. व्यग्र दिनक्रमामुळे आणि मशिनच्या अतिसंपर्कामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढून नवे आजार निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्या वेळी आपल्याला यंत्रांपेक्षा माणूस अधिक जवळचा आणि हवाहवासा वाटेल. तेव्हा घड्याळातील काटा पुढे जात असताना स्मार्टफोन आणि मशिनपेक्षा माणूस महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवावे लागेल. माणूस म्हणून इतरांशी ममत्वाने, प्रेमाने आणि आपुलकीने वागण्याचा संदेश या अद्‌भुत वळणावर देण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा