'AI ठरू शकतं महामारी आणि अणुयुद्धाप्रमाणेच घातक! संपूर्ण मानवता होऊ शकते नष्ट'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा | AI can pose risk of extinction as great as pandemic or nuclear war Top experts issue a 22-word warning | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AI Risk Warning

'AI ठरू शकतं महामारी आणि अणुयुद्धाप्रमाणेच घातक! संपूर्ण मानवता होऊ शकते नष्ट'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वच आर्टिफिशिअल इंटिलिजन्सबाबत वारंवार ऐकतो आहे. एआयमुळे आपली बरीच कामं सोपी झाली आहेत. मात्र, एआय ही दुधारी तलवार असल्याप्रमाणे आहे. त्यामुळेच एआयबाबत जगभरातील तज्ज्ञांनी एक गंभीर इशारा दिला आहे.

"महामारी आणि अणुयुद्धाप्रमाणेच एआयमुळेही मानवजात नष्ट होण्याचा धोका आहे, त्यामुळे एआयकडेही तेवढंच गांभीर्याने पहायला हवं" असा इशारा (Top experts issue warning against AI) जगभरातील तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळेच सर्वांनी यावर मात करण्यासाठी चर्चा सुरू करणं गरजेचं असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे.

हे निवेदन सेंटर फॉर एआय सेफ्टीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यावर टेक क्षेत्रातील ३५० तज्ज्ञ व्यक्तींच्या सह्या आहेत. यामध्ये चॅटजीपीटीचे फाऊंडर आणि ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन, गुगल डीपमाईंडचे मुख्य कार्यकारी डेमिस हस्साबीस, अँथ्रोपिकचे डेरिओ अ‍ॅमोडे, एआयचे 'गॉडफादर' म्हणून ओळखले जाणारे जॉफरी हिंटन (Godfather of AI) अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

घाई गरजेची

जॉफरी हिंटन यांनी यापूर्वीही एआयबाबत इशारा दिला होता. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजपेक्षाही तातडीने आपल्याला एआयच्या धोक्याबाबत विचार करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले होते. गुगल एआयचे अधिकारी लीला इब्राहिम आणि मारियन रॉजर्स, तसंच यूएनच्या निःशस्त्रकरणासाठीच्या माजी प्रतिनिधी अँजेला केन अशा कित्येक प्रतिष्ठित व्यक्तींनी या मताला दुजोरा दिला आहे.

चाचणी थांबवण्याची मागणी

काही दिवसांपूर्वीच जगभरातील टेक लीडर्सनी जीपीटी-४च्या पुढील क्षमतेच्या एआय सिस्टीमची चाचणी सहा महिन्यांसाठी थांबवण्याची मागणी केली होती. यामध्ये इलॉन मस्क, अ‍ॅपलचे को-फाऊंडर स्टीव्ह वॉझनिक यांच्यासह हजारो टेक लीडर्सचा समावेश होता.

किती प्रगत हवं एआय?

"आपण खरंच असे सॉफ्टवेअर्स किंवा एआय तयार करायला हवेत का, जे एक दिवस आपल्यापेक्षा हुशार होतील, आपल्यापेक्षा संख्येने अधिक होतील आणि हळूहळू आपली जागा घेतील" याबाबत विचार करणं गरजेचं आहे, असंही या पत्रात म्हटलं आहे.

बॉम्बशी तुलना

अब्जाधीश गुंतवणुकदार असणारे वॉरेन बफेट यांनी एआयची तुलना अ‍ॅटोम बॉम्बशी केली आहे. "एआय सगळं काही करू शकतं. जेव्हा अशी एखादी गोष्ट समोर येते जी सगळंच करू शकते, तेव्हा मला काळजी वाटू लागते. आपण बॉम्बचा शोधदेखील चांगल्या कारणासाठीच लावला होता." अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली भीती व्यक्त केली.