अजिंक्‍यचा ‘सारथी’ रोबोट पोचला जर्मनीत

अजिंक्‍यचा ‘सारथी’ रोबोट पोचला जर्मनीत

कोल्हापूर -  विचारांचे योग्य पद्धतीने सारथ्य केले तर संशोधनालाही यश येते. त्यासाठी एकलव्याप्रमाणे स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवून वाटचाल केल्यास अशक्‍य वाटणारे यश शक्‍य होते. देवकर पाणंद येथील अजिंक्‍य दिलीप दीक्षित याने हे सिद्ध करून दाखवले आहे. त्याने बनवलेला ‘सारथी’ हा रोबोट जर्मनीमध्ये जाऊन पोचलाय.   

विद्यापीठ हायस्कूलमध्ये मराठी माध्यमात शिकून त्याने पुढे कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. त्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण केले. लहानपणापासूनच त्याला इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची आवड... या त्याच्या जिद्दीने गेली दोन वर्षे तो रोबोट बनवण्याचे काम करत आहे. आज त्याने बनवलेला ‘सारथी’ हा रोबोट जर्मनीमध्ये जाऊन पोचलाय. अजिंक्‍यचा हा रोबोट मेकिंगचा प्रवास युवकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून अजिंक्‍य कोल्हापुरातला पहिला रोबोटमेकर ठरला आहे. 

फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केलेल्या या संशोधनात त्याला ‘मेकर्स लॅब ऑफ टेक महिंद्रा’ यासारखे व्यासपीठ मिळाले. त्याच्या या संशोधनात मोलाची साथ देणाऱ्या निखिल मल्होत्रा यांनी प्रोजेक्‍ट प्रमुख म्हणून काम पाहिलं, तर रामानंद निवघेकर यांनी सॉफ्टवेअरची जबाबदारी सांभाळली. त्याची कंपनीतील सहकारी शीतल पाटील हिचाही सहभाग आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून ‘सारथी’ साकारला आहे.

विद्यापीठ हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये डिप्लोमाला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग भारती विद्यापीठातून पूर्ण केले. तिथे शिकत असतानाच पहिला कमर्शिअल रोबोट कॅमेरा बनवून तो टेक महिंद्रा कंपनीला दिला. या ड्रोनच्या संपूर्ण हार्डवेअरची निर्मिती अजिंक्‍यने केली. २०१६ रोजी कंपनीला हा ड्रोन कॅमेरा दिला. त्याच्या सॉफ्टवेअरवर काम करून त्याच्या चाचण्या घेतल्या, या यशस्वी चाचण्यांनंतर रोबोटला ‘सारथी’ असं नाव दिलं.

कंपनीने त्याला ‘रोबोट बॉर्न इन कोल्हापूर विथ सोल फ्रॉम टेक महिंद्रा’ असं नाव दिले आहे. हा कोल्हापूरच्या शिरपेचात नक्कीच मानाचा तुरा म्हणावा लागेल. याबरोबरच अजिंक्‍य इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करतो, तसेच गडहिंग्लजमध्ये शीतल पाटील हिच्याबरोबर त्याने ‘ए रोबोटिक्‍स टेक्‍स सोल्युशन’ नावाची कंपनी स्थापन केलेली आहे. अशा प्रकारचे संशोधन करून कोल्हापूरचं नाव तो जगाच्या नकाशावरही नेऊ पाहत आहे. या संपूर्ण प्रवासात आपल्या आईवडिलांची प्रेरणा आणि कंपनीतील सहकाऱ्यांची साथ महत्त्वाची असल्याचं त्यानं सांगितलं. अजिंक्‍यचे वडील आयुर्वेदिक डॉक्‍टर आहेत तर आई शासकीय नोकरीतून 
निवृत्त आहे. 

एकविसाव्या शतकात युवकांनी एकलव्यासारखे असावे. कोणीही शिकवण्यापेक्षा स्वतः शोध घ्यावा आणि एखादं नवीन संशोधन करावं, या स्वयंप्रेरणेतून हा ‘सारथी’ साकारलेला आहे. ‘सारथी’ आपली अनेक कामं करून आपलं जीवन सुलभ करू शकतो.
- अजिंक्‍य दीक्षित,
सारथी रोबोटचा निर्माता
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com