Albert Einstein Death Anniversary : महान शास्त्रज्ञातील सामान्य माणूस.. कसं होतं अल्बर्ट आईनस्टाईनचं वैयक्तिक आयुष्य?

“क्वांटम थिअरीच्या सत्यापासून फारकत घेणारे कदाचित वेडे म्हणून गणले जातील!”, प्रागच्या जर्मन युनिव्हार्सिटीमधल्या, भौतिक शाश्त्राच्या विभागातून खिडकीतून डोकावत आईन्स्टाइन त्यांच्या सहयोग्याला म्हणाले.
Albert Einstein
Albert Einstein eSakal

Albert Einstein : “विज्ञान ही एक जीवनपद्धती आहे. बेसिक सायन्स मधून डिग्री घेण्यापुरतं किंवा मानवी भावभावनांच्या गुंत्यात गुरफटलेल्या श्रद्धांच्या उग्र विरोधात उभं ठाकण्यापुरतं विज्ञानाचं अस्तित्व नाही. या ज्ञानशाखांचा अभ्यास, जतन आणि संशोधन ही अविरत चालणारी एक शृंखला आहे. तिचं प्रदर्शन होऊ शकत नाही. प्रदर्शनात स्थित अशी मृत प्रतिमा असते! जिवंत मानवांच्या अस्मितांना छेद देत निघालेल्या फोटॉन्सचा लिनियर प्रवाह हा अडवता येत नाही, द्विअस्तित्वाची सन संहिता आहे त्या प्रकाशाची!"

तो माणूसच होता. माणूस म्हणून जगला. मानवी भावभावनांच्या ग्रॅव्हिटीने बांधल्या गेलेल्या त्याच्या आयुष्याचं फॅब्रिक निश्चितच झुकलेलं. विज्ञान तुम्हाला एकमेकांच्या विरोधात उभा करत नाही. सर आयझॅक न्यूटन आणि सर अल्बर्ट आईन्स्टाईन हे कुठेतरी विरोधक असल्याचा भ्रम आपण निर्माण करतो. विज्ञानाची मांडणी लिनियर आहे. मी शिकवताना तीन प्रश्न विचारायला सांगतो, “व्हाट?, व्हाय?, आणि हाऊ?” एरीस्टोटल, गॅलिलिओ, सर योहानेस केप्लर, सर आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आईन्स्टाईन हि २५००+ वर्षांची उतरंड आहे गुरुत्वाकर्षणाची. येणारा पुढचा स्वतःच्या रेणूंचा भार बाजूला सारून मागच्याच्या डोळ्यांनी पाहतो. पाहणं महत्वाचं, कोण डोकावतंय यात विज्ञानाला स्वारस्य नाही!

“क्वांटम थिअरीच्या सत्यापासून फारकत घेणारे कदाचित वेडे म्हणून गणले जातील!”, प्रागच्या जर्मन युनिव्हार्सिटीमधल्या, भौतिक शाश्त्राच्या विभागातून खिडकीतून डोकावत आईन्स्टाइन त्यांच्या सहयोग्याला म्हणाले. एप्रिल १९११ साली झ्युरीक वरून परतल्या नंतर त्यांच्या ऑफिस समोर असलेल्या एका बागेतील एक विक्षिप्त घटना त्यांच्या नजरेस पडली. ती बाग सकाळी फक्त स्त्रियांसाठी खुली असायची आणि दुपारी पुरुषांसाठी! ते स्वतः त्या वेळी एका मोठ्या द्वंदाच्या विवंचनेतून जात होते. समोरची ती सुंदर बाग एका मनोरुग्णालयाची होती! आईन्स्टानना ड्युएल नेचर ऑफ लाईट आणि क्वांटम यांची सांगड घालणं अवघड झालेलं. दिवसागणिक त्यांच्यासाठी क्वांटमचं ओझं अवजड झालं आणि नोव्हेंबर १९११ मध्ये क्वांटमचा वेडेपणा दूर सारला. दरम्यानच्या काळात सर नील्स बोहर आणि त्यांच्या अणूने एक्सप्लोरेशन चा झोत आपल्याकडे वळवला होता. आईन्स्टाईन पुढील चार वर्षे त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला गुरुत्वीय बलाची सांगड घालत यशस्वीपणे जनरलायझेशनकडे नेण्याकडे गुंतून गेले.

Albert Einstein
Isaac Newton : जादूटोण्याच्या मार्गाला लागला होता प्रसिद्ध वैज्ञानिक न्यूटन; शोधत होता 'परीस'.. पण का?

मानवाला सहयोगी लागतात. मित्र लागतात. निनावी पाठीराखे लागतात. शत्रू लागतात. तो काळ युद्धाचा काळ होता. आणि आईन्स्टाईन साठी त्याच्या जीवनातील युद्धाचा! इ.स. १९११ च्या अखेरीस नील्स बोहर कॅम्ब्रिजहून मँचेस्टरला जाण्याच्या तयारीत होते. आईन्स्टाईनना देखील स्वित्झर्लंडला परत जाण्याची तीव्र इच्छा होती. त्यांचा एक जुना मित्र त्यांच्या हाकेला धावून आला. स्विस फेडरल टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या (ईटीएच) गणित आणि भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झालेल्या मार्सेल ग्रॉसमन यांनी आइन्स्टाईनना झुरिचच्या पॉलिटेक्निकमध्ये प्राध्यापक पदाची ऑफर दिली. अर्थात मित्र असला तरीही त्यांना नियुक्तीचे सर्व संकेत पाळूनच हे करता येणार होतं. हेन्री पॉइनकेअर, प्रसिध्द गणिती, सिद्धांतकार, हे त्याकाळातील फ्रांस मधलं खूप मोठं नाव होतं. ग्रॉसमन यांनी पॉइनकेअरशी सल्लामसलत केली. “वन ऑफ द मोस्ट ओरिजिनल माइंड्स”, असं वर्णन केलं हेन्री पॉइनकेअर यांनी आईनस्टाईनचं. एके काळी जिथे सहाय्यकाची नोकरी आईन्स्टाईनना नाकारण्यात आली होती त्याच ठिकाणी जुलै १९१२ मध्ये आईनस्टाईन एक प्रसिध्द भौतिकशास्त्री बनून परतले होते!

कदाचित आईन्स्टाईनच्या ग्रॅव्हिटीचा इलिप्टीकल लोकस इथे पूर्ण झाला असावा.

झुरिचमध्ये आपला ३५ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर आइनस्टाईन मार्च १९१४ च्या अखेरीस बर्लिनला गेले. जर्मनीला परत जाण्याबद्दल त्याच्या मनात कितीही आक्षेप असले तरी त्यांना बर्लिन रोमांचक वाटण्याचे आणखी एक कारण होते – त्यांची मावस बहिण एल्सा लोवेन्थल!

सर्व अमानवी गुण-अवगुणांचं मिश्रण होते आईन्स्टाईन असं म्हणणं कदाचित अतिशयोक्ती ठरेल. भारतीय संस्कृतीमध्ये आपण वैवाहिक किंवा संसारिक मुल्ये निर्धारित करून त्या फ्रेम बाहेर जगणाऱ्या जीवांना नैतिक-अनैतिकतेच्या व्याख्येत गुंतवून ठेवत आपलं जगणं विसरून जातो. आईन्स्टाईन त्यांना हवे तसे जगले. कदाचित हाही आवेग ठरेल, खरंतर असं म्हणता येयील, त्यांच्या सहवासात असलेल्यांना न्याय देण्याच्या प्रयत्नात ‘स्व’ शाबूत ठेवून जगले.

एकदा बर्लिनमध्ये गेल्यानंतर आईनस्टाईन अनेकदा स्पष्टीकरणाशिवाय कित्येक दिवस गायब असायचे. तशी त्यांनी लवकरच पूर्ण फारकत घेतली. कुटुंबामध्ये परतण्यासाठी त्यांनी काही अटी त्यांची पत्नी असलेल्या मिलेव्हा जवळ ठेवल्या. मिलेव्हाने त्यांच्या त्या विक्षिप्त मागण्या बिनशर्त मान्य केल्या, ज्याचा सारांश होता, आईनस्टाईन आणि मिलेव्हा आता फक्त कायद्याने पती पत्नी असतील. याधावकाश हे काही फार दिवस चाललं नाही आणि अवघ्या तीन एक महिन्यात मिलेव्हा तिच्या दोन्ही अपत्यांना घेऊन झुरिकला परतली. आईन्स्टाईनचे डोळे पाणावले खरे, कदाचित आपल्या सोडून गेलेल्या दोन मुलांसाठी असतील. परंतु काही आठवड्यांमध्ये ते पूर्वपदावर आले. त्यांनी लिहून ठेवलंय, “आता मी माझ्या मोठ्या अपार्टमेंट मध्ये समाधिस्त शांतता उपभोगतोय!” अवघा युरोप युद्धात लोटलेला असताना अशी शांतता कदाचित खुप कमी लोकांच्या नशिबी असेल.

Albert Einstein
Stephen Hawking : जेव्हा जगातील महान वैज्ञानिकाने 'टाईम-ट्रॅव्हलर्स'साठी पार्टी ठेवली होती...

न्यूटनच्या आधीही असे गृहीत धरले गेले होते की, काळ आणि अवकाश हे स्थिर आणि वेगळे आहेत, ज्या रंगभूमीवर विश्वाचे कधीही न संपणारे नाटक रंगले होते. हा एक असा आखाडा होता जिथे वस्तुमान, लांबी आणि काळ निरपेक्ष आणि अपरिवर्तनीय होते. हे एक असे रंगमंच होते ज्यात घटनांमधील स्थानिक अंतर आणि वेळेचे अंतर सर्व निरीक्षकांसाठी समान होते!

आईन्स्टाईनने या गृहितकांना छेद दिला. वस्तुमान, लांबी आणि काळ हे निरपेक्ष आणि अपरिवर्तनीय नसतात, हे शोधून काढले. स्थानिक अंतर आणि वेळेचे अंतर हे निरीक्षकांच्या सापेक्ष गतीवर अवलंबून होते. यातून पुढे सापेक्षतावादाच्या दोन्ही थिअरीज आल्या.

आईन्स्टाईनचं अवलोकन करू तेव्हा कदाचित व्यक्तीसापेक्ष मत-मतांतरे असू शकतील!

आईनस्टाईनला त्रास देणारी गोष्ट म्हणजे जमिनीच्या वर सफरचंद धरल्यासारखी परिस्थिती होती, की सोडली की ती पडतच नाही. एकदा सफरचंद सोडले की ते जमिनीवर पडण्याच्या अवस्थेच्या संदर्भात अस्थिर अवस्थेत असते, त्यामुळे सफरचंदावर गुरुत्वाकर्षण ताबडतोब कार्य करते, ज्यामुळे ते पडते. जर सफरचंद उत्तेजित अणूतील इलेक्ट्रॉनसारखे वागत असेल, तर ते सोडताच मागे पडण्याऐवजी ते जमिनीच्या वर फिरत असेल. सफरचंद अगदी कमी वेळात पडण्याची दाट शक्यता असू शकते, परंतु सफरचंद तासनतास जमिनीच्या वर फिरण्याची शक्यता कमी आहे. यातून उत्विग्न होऊन आईन्स्टाईन यांनी एखादं साधं काम करेन, पण फिजीसिस्ट व्हायला नको असंही म्हणाले.

पुढे या युद्धाच्या काळात अन्न मिळणं अडचणीचं बनत होतं. आईनस्टाईनच्या आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्या. दरम्यान मिलेव्हा सोबत नोबेल पुरस्कारातून जी रक्कम येऊन ती वाटण्यावर त्यांनी सामंजस्य करार केला. हो करारच. त्यांच्या नात्यात आता फारसं काही उरलं नव्हतं. नोबेल मिळवणं त्यांच्यासाठी आता जास्तच महत्वाचं झालेलं. मला नेहमी वाटतं विज्ञानाला दारिद्र्याचा श्राप असावा कदाचित.

- आकाश शिवदास चटके

(लेखक सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गणित विषयाचे प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com