Moon to Mars : अमित क्षत्रिय यांच्याकडे ‘चंद्र ते मंगळ’ मोहिमेची धुरा

संशोधनाचे सुवर्णयुग; भारतीय वंशाच्या अभियंत्यांची मोठी झेप
Amit Kshatriya has Moon to Mars mission nasa
Amit Kshatriya has Moon to Mars mission nasasakal

वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या चंद्र ते मंगळ या महत्त्वाकांक्षी मोहिमेची धुरा भारतीय अमेरिकी वंशाचे सॉफ्टवेअर आणि रोबोटिक इंजिनिअर अमित क्षत्रिय यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चंद्रावर मानवी अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटवून नंतर लाल ग्रह मंगळाच्या दिशेने झेप घेण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे.

या मोहिमेची सर्व सूत्रे नासाने क्षत्रिय यांच्याकडे सोपविली आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. चंद्र आणि मंगळावर मानवी अस्तित्वाला पूरक अशा वातावरणाची पडताळणी करण्याबरोबरच त्याचा भविष्यातील मोहिमांसाठी कशा पद्धतीने लाभ उठविता येईल? याचा देखील शोध घेण्यात येईल, असे नासाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अंतराळ संशोधनाचे सुवर्णयुग सुरू झाले असून लाल ग्रह मंगळाच्या दिशेने मोठी झेप घेण्यासाठी चंद्रावर दीर्घकाळ पाय रोवून उभे राहता येणे गरजेचे आहे. ही मोहीम नासाने त्यादृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असे नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रावर जाण्यासाठी काही धाडसी मोहिमा आखण्यात येणार असून मंगळावरील पहिल्या मानवी मोहिमेची या माध्यमातून पायाभरणी करण्यात येईल असेही नेल्सन यांनी स्पष्ट केले. या नव्या मोहिमेचे कार्यालय हे एक्स्प्लोरेशन सिस्टिम डेव्हलपमेंट मिशन डायरेक्टोरेट अंतर्गत असेल त्याचे प्रमुख सहाय्यक प्रशासक जिम फ्री यांच्या नेतृत्वाखाली क्षत्रिय काम करतील असे सांगण्यात आले.

याआधीची कामगिरी

क्षत्रिय यांनी या आधी स्पेस लॉँच सिस्टिम ओरिऑन आणि एक्सप्लोरेशन ग्राउंड सिस्टिम्स प्रोग्रॅमवर देखील काम केले आहे. आर्टेमिस कॅम्पेन डेव्हलपमेंटशी देखील ते संबंधित होते. क्षत्रिय यांची कारकीर्द २००३ मध्ये सॉफ्टवेअर आणि रोबोटिक इंजिनिअर म्हणून सुरू झाली होती.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठीच्या रोबोटिक उपकरणांच्या जुळवणीसाठी ते काम करत होते. ते २०१४ ते २०१७ या काळामध्ये अवकाशस्थानकाचे चे फ्लाइट डायरेक्टर होते. येथे त्यांनी आंतरराष्ट्रीय पथकाचे नेतृत्व करण्याचे काम करत अवकाशस्थानकाच्या दिशेने होणाऱ्या सर्व मोहिमांचे संचलन केले. २०२१ मध्ये एक्सप्लोरेशन सिस्टिम्स डेव्हलपमेंट मिशन संचालनालयामध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com