इथं तयार होईल फेसबुक, ॲपल...

डॉ. अनंत सरदेशमुख
रविवार, 1 जानेवारी 2017

‘स्टार्ट अप’वर सध्या जोर दिला जात आहे. उद्योजकतावाढीला प्राधान्य दिले जात आहे. अशा या वातावरणात पुणे हे ‘स्टार्ट अप’चे एक यशस्वी माहेरघर झाले आहे. इथे ४००हून जास्त ‘स्टार्ट अप’ आहेत. या शुभारंभाला जर खतपाणी घालू शकलो, तर पुण्यात नक्कीच अनेक फेसबुक, ॲपल निर्माण होऊ शकतील.

‘स्टार्ट अप’वर सध्या जोर दिला जात आहे. उद्योजकतावाढीला प्राधान्य दिले जात आहे. अशा या वातावरणात पुणे हे ‘स्टार्ट अप’चे एक यशस्वी माहेरघर झाले आहे. इथे ४००हून जास्त ‘स्टार्ट अप’ आहेत. या शुभारंभाला जर खतपाणी घालू शकलो, तर पुण्यात नक्कीच अनेक फेसबुक, ॲपल निर्माण होऊ शकतील.

पुणे शहर हे आता फक्त पुणे शहर म्हणूनच ओळखले जात नाही, तर जेव्हा जेव्हा पुण्याचा उल्लेख होतो व विशेष करून उद्योग, व्यापार संबंधित उल्लेख होतो तेव्हा तेव्हा पुणे म्हणजे पुणे, पिंपरी, चिंचवड, भोसरी, तळेगाव, रांजणगाव, चाकण इत्यादी पुण्याला लागून असलेल्या भागांच्या समावेशानेच हा उल्लेख होतो. याचे मुख्य कारण म्हणजे पुण्याची अर्थव्यवस्था, उद्योग हा या सर्व भागांशी घट्ट बांधला गेला आहे, निगडित झाला आहे. पुणे हे आता महानगर आहे आणि पुण्याशी निगडित असलेले हे विभाग पुण्याचाच अविभाज्य भाग आहेत. पुण्याचा विकास, पुण्याची अर्थव्यवस्था, उद्योग, व्यापार यांचा जेव्हा विचार करायचा असेल तेव्हा या पुणे महानगराचाच विचार करावा लागेल. पुणे आणि पुण्याशी जोडल्या गेलेल्या भागाच्या विकासाचा जेव्हा दूरदर्शी विचार सुरू झाला तेव्हा पुणे महानगर या संकल्पनेचा जन्म झाला आणि आता त्याला कायदेशीर सरकारी मान्यतासुद्धा मिळाली आहे. 

पुणे मेट्रोपोलिटन रिजन म्हणजेच पुणे महानगर याची निर्मिती सुमारे दोन वर्षांपूर्वी सुमारे ६७०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा भाग एकत्र करून झाली आहे. यात पुणे शहर, पिंपरी, चिंचवड या महापालिका व नगर परिषदा त्याच प्रमाणे हवेली, मावळ, भोर, दौंड, शिरूर, मुळशी आणि खेड या पुणे जिल्ह्यातील तालुक्‍यांचा समावेश आहे. हा सर्व विभाग महाराष्ट्रातील सर्वांत मोठा शहरी भाग असेल व मुंबई महानगर प्रदेशापेक्षा सुमारे ३० टक्के मोठा असेल.

पुणे महानगर क्षेत्र महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत, अर्थकारणात आणि उद्योगात एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून आहे. महाराष्ट्राच्या एकंदर शहरी ढोबळ उत्पादनात किंवा वार्षिक सकल उत्पन्नात (या क्षेत्रात बनणाऱ्या सर्व उत्पादनाचे व पुरविल्या जाणाऱ्या सेवांचे एकत्रित मूल्य) सुमारे १५ टक्के सहभाग हा पुणे क्षेत्राचा आहे ज्याचे साधारण मूल्य ९२९०० कोटी रुपये असेल. हे वार्षिक सकल उत्पन्न म्हणजेच वार्षिक ढोबळ उत्पादनसुद्धा एक लाख कोटीकडे उड्डाण करत आहे.

पुणे महानगर क्षेत्राची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार सुमारे ७५ लाख आहे जिचे कोटी कडे उड्डाण झाले आहे आणि एका अंदाजानुसार २०३० वर्षांपर्यंत हीच लोकसंख्या  १ कोटी ४० लाखांपर्यंत पोचेल.

भारतातील आघाडीवर असलेल्या शहरी क्षेत्रांच्या ढोबळ उत्पन्नातील वाढीचा २००५ ते २०१४ या काळाचा अभ्यास केला, तर पुणे महानगर क्षेत्राचा या ढोबळ उत्पादनाच्या वाढीचा वेग (८.३ टक्के) कोची (१३.५ टक्के), अहमदाबाद (१२.४ टक्के) हैदराबाद (११.४ टक्के), बंगळुरू (११.१ टक्के), सुरत (१०.७ टक्के), दिल्ली (९.४ टक्के), चेन्नई (९  टक्के), मुंबई (८.४ टक्के) पेक्षा कमी दिसून येतो. (संदर्भ : सीएसओ, मॅंकेन्झी इनसाइट्‌स इंडिया, मॅकेन्झी अभ्यास) अनेक नैसर्गिक साधन-संपत्ती तसेच उपजत क्षमता, कौशल्य असतानासुद्धा हा विकास त्यामानाने समाधानकारक नक्कीच नाही. याची कारणे अनेक आहेत. बंगळुरूला भारतातील ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळखले जाते. गुडगाव हे भारतातील अग्रगण्य उत्पादन केंद्र बनले आहे. पुणे मात्र सर्व काही असून आपली अशी विशिष्ट प्रतिमा बनवू शकले नाही. यात धोरण, नियोजन व सरकारी पाठबळ या समर्थ उद्योगाला व उद्योगी जनतेला मिळाले नाही असेच म्हणावे लागेल. 

पुण्याकडे आकर्षण
पुणे हे एक भारतातील वाहन उद्योगाचे, आयटीचे महत्त्वाचे केंद्र आहे. पुण्याची क्षमता मोठी आहे व ती ओळखल्यामुळेच परकीय गुंतवणूकदारांचा पुण्याकडे कल मोठ्या प्रमाणात आहे. आज पुण्याला भारतातील सर्वांत मोठा जर्मन उत्पादन कंपन्यांचा भाग म्हणून ओळखले जाते. तंत्रज्ञान, उत्पादनात जर्मनीचा जगात वरचा क्रमांक लागतो व असा देश पुण्याकडे आकर्षित होतो याचाच अर्थ पुण्याकडे हे तंत्रज्ञान कौशल्य आहे आणि म्हणूनच हे देश पुण्याला प्राधान्य देतात असाच होतो. 

पुण्यात सुमारे ३००हून अधिक जर्मन कंपन्या आहेत, त्याच प्रमाणे कोरियन, तैवान, युरोपातील अनेक देशांतील तसेच अमेरिका, इंग्लंड, स्वीडन, इटली इत्यादी अनेक देशांतील कंपन्या आहेत. या कंपन्या इथे प्रस्थापित झाल्या आहेत त्यांनी इथे गुंतवणूक केली आहे हा एक पुण्याच्या योग्यतेचा, क्षमतेचा, अनुभवाचा, कौशल्याचा पुरावा, दाखला आहे. दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार प्रस्थापित झाल्यावर चीन आणि भारत यांमध्ये ज्या चर्चा झाल्या, त्यात चीनने अहमदाबाद बरोबर पुण्यात सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक वाहन उद्योगसमूह स्थापन करण्याची घोषणा केली होती. अर्थात त्यात काय प्रगती झाली हा प्रश्न आहे. याचबरोबर सुमारे पाच एक वर्षांपूर्वी जपाननेही पुण्याजवळ असाच एक उद्योगसमूह सुरू करण्याची घोषणा केली होती. ती योजनासुद्धा कुठे तरी विरलेली दिसते. 

 मनुष्य संपत्ती व भांडवल
महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला. २०१५च्या पहिल्या आठ महिन्यांत ही परकीय गुंतवणूक २५ हजार कोटीपर्यंत पोचली, अशी आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावर दिली होती. यातील मोठी गुंतवणूक पुणे विभागात अपेक्षित होती. जनरल मोटर्स ६५०० कोटी, क्राईसलर १७०० कोटी अशा अनेक गुंतवणुकी जागतिक महत्त्वाच्या कंपन्या पुणे विभागात करत आहेत. या बाबतीत आपण ‘पुणे तिथे काय उणे’ असे नक्कीच म्हणू शकू. पुण्याला आपण सर्वच नाही, तर जगातील पूर्वेचे ऑक्‍सफोर्ड म्हणून ओळखतो. पुण्याजवळ नुसतेच मनुष्यबळ नाही, तर मनुष्य संपत्ती व भांडवल आहे. पुण्यात सुमारे ३० टक्के पदवीधरांची फौज तयार होते; ज्याचे देशातील सरासरी प्रमाण १० टक्के आहे. या अक्षय संपत्तीचा फायदा आपल्याला नक्कीच मिळतो, त्याचा पूर्णपणे विनियोग करून घेणे म्हणजेच चिरकाल समृद्धीकडे प्रस्थान करणे.    

आज नवनिर्माण झालेली अनेक राज्ये या ‘स्टार्ट अप’च्या बाबतीत पुढे गेलेली दिसतात. आपण जर ठरवले तर त्यांना नुसतेच गाठणार नाही, तर आपले वर्चस्व प्रस्थापितसुद्धा करू शकू. हे असे जर झाले तर पूर्वी आणि आत्तासुद्धा जे भारतातून अमेरिकेत जे ‘ब्रेन ड्रेन’ होते त्याचा उलटा प्रवाह सुरू होईल, अशी आशा करायला काहीच हरकत नाही. 

इतर देशांच्या तुलनेत मोठी झेप
जर आपण १० ते १२ टक्के सकल उत्पन्न, किंवा ढोबळ उत्पादन वाढ प्राप्त करण्याचे ध्येय स्वीकारू शकलो तर मॅकेन्झीच्या एका अभ्यासानुसार पुणे क्षेत्राचे सकल उत्पन्न किंवा ढोबळ उत्प्पादन २०३० सालापर्यंत सुमारे साडेसहा कोटींच्या घरात पोचू शकते व आपले हे उत्पन्न चेन्नई पेक्षा जास्त व जवळजवळ हंगेरी या देशाइतके होऊ शकते. हे असे जर झाले, तर आपण व्हियेतनाम, कुवेत, इराक इत्यादी देशांपेक्षा मोठे होऊ शकू. अर्थातच यात लोकांच्या, उद्योजकांच्या प्रयत्नांना सरकारी धोरणांचे व त्याहून महत्त्वाचे म्हणजे धोरण अंमलबजावणीचे साह्य जरुरी आहे. इतक्‍या या मोठ्या अर्थव्यवस्थेला एक राज्य म्हणून विचार करून चालणार नाही, धोरणे ठरवता येणार नाहीत, तर ‘एक देश’ याप्रमाणे विचारात व धोरणात आंतरराष्ट्रीय विचार येणे व होणे जरुरी आहे.

कोरिया, तैवान इत्यादी देशांच्या विकासाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की, त्यांची आर्थिक व औद्योगिक प्रगती ही मुख्यता औद्योगिक उत्पादनावर म्हणजेच उत्पादनांवर भर देऊन झाली आहे. हाच विचार आपण पुणे क्षेत्राच्या पुढील विकासात आणणे जरुरी आहे. सुदैवाने पुणे क्षेत्राचे सामर्थ्य हे औद्योगिक उत्पादन हेच आहे आणि या सामर्थ्याचा आपण नवीन तंत्रज्ञानासह पूर्णपणे उपयोग करून घेणे जरुरी आहे. नावीन्यपूर्ण उत्पादन, अन्नप्रक्रिया उद्योग, संरक्षण उद्योग, इलेक्‍ट्रॉनिक उत्पादने, वैद्यकीय उत्पादने, साधने याचप्रमाणे संगणक प्रणाली उद्योग व औद्योगिक उत्पादन उद्योग यांच्या सहकार्याने, एकत्र येण्याने आपण नवीन तंत्रज्ञान विकसित करून ते जगाला देऊ शकतो. याचबरोबर सेवा क्षेत्रातील नव्याने पुढे येणाऱ्या असंख्य संधींचा आपण लाभ घेऊ शकतो. पर्यटन, जैविक विज्ञानातील तसेच, बांधकाम, वित्तीय सेवा यातील नवीन विचार, सेवा विकसित करण्याकरता पुणे क्षेत्र समर्थ आहे. आज जर्मनीत रुजलेला उद्योग किंवा इंडस्ट्री हा भविष्यात महत्त्वाचा ठरणारा, प्रचलित होणारा उद्योग आणि तंत्रज्ञान यांच्या संगमातून एक नवीन औद्योगिक क्रांती घडवून आणणारा विचार मूळ धरत आहे. या प्रणालीचे आपण स्वागत करून ती जर पुण्यात रुजवली तर आपली ही कोटीच्या कोटी उड्डाणे प्रगतीकडे नक्कीच घेऊन जातील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anant Sardeshmukh writes about future of Pune city in technology field