
iPhone पाठोपाठ भारतात बनणार Apple Airpod, उभारला जातोय 1650 कोटींचा प्लांट
Apple Airpod Plant In India : आयफोन बनवणारी कंपनी अॅपल उत्पादनासाठी चीनवरील आपले अवलंबित्व सतत कमी करत आहे. यामुळे अॅपलची सर्वात मोठी मेन्यूफॅक्चरर कंपनी फॉक्सकॉनने सर्वप्रथम भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले. आता कंपनीनेही भारतात एअरपॉड बनवण्याची योजना आखली आहे. यासाठी अॅपल भारतात सुमारे 1,650 कोटी रुपये खर्चून प्लांट उभारणार आहे.
फॉक्सकॉनला अॅपल कडून एअरपॉड बनवण्याची ऑर्डर मिळाल्याची बातमी आहे. काही न्यूज एजन्सीने सूत्रांचा हवाला देत ही बातमी प्रसिद्ध केली आहे. फॉक्सकॉनला एअरपॉड्स बनवण्याची ऑर्डर मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या अनेक चीनी पुरवठादार अॅपल एअरपॉड एकत्र तयार करतात.
फॉक्सकॉन तेलंगणात प्लांट उभारणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉन एअरपॉड प्लांटसाठी सुमारे 1,650 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. कंपनी त्यांचा प्लांट भारतातील तेलंगणा राज्यात उभारण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीला किती एअरपॉड बनवण्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Foxconn ची उपकंपनी Foxconn Interconnect Technologies Limited या वर्षाच्या उत्तरार्धात तेलंगणात एअरपॉड बनवण्याचा प्लांट बांधकाम सुरू करू शकते. एअरपॉड्सचे उत्पादन 2024 पर्यंत सुरू होऊ शकते.
अॅपलने भारतात प्लांट उभारणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात एअरपॉड निर्मिती प्रकल्प उभारण्याची शिफारस अॅपल कंपनीनेच केली होती. त्यामुळे आता अॅपल आणि फॉक्सकॉनचे संबंध आणखीन मजबूत होण्याची शक्यता आहे.