ऍपनिंग : घरबसल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास 

ऍपनिंग : घरबसल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास 

"कोरोना'मुळे गेले तीन महिने देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे स्थलांतरित कामगारांप्रमाणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थीही वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. अखेर सरकार आणि अनेक संघटनांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचवले. मात्र, अभ्यासासाठी लागणारे मोजकेच साहित्य त्यांना सोबत नेता आले. त्यामुळे घरी गेल्यानंतर आता अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. काहींनी "यू-ट्यूब', काहींनी "टेलिग्राम'चा आधार घेतला, तर काही स्मार्ट विद्यार्थ्यांनी ऍप्सची मदत घेतली. "यूपीएससी' आणि "एमपीएससी' या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे योग्य तयारीशिवाय सोपे नाही. त्यामुळे "कोरोना'काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास करता यावा, यासाठी अनेक संस्थांनी ऍप्स उपलब्ध केली आहेत. त्यापैकी काही लोकप्रिय ऍपविषयी माहिती येथे दिली आहे. या ऍपमध्ये अभ्यासासाठी लागणारी पुस्तके, प्रश्नपत्रिका संच आणि इतर सामग्री एका क्‍लिकवर उपलब्ध आहे. 

मृणाल - प्रत्येक टॉपिकवर आधारित व्हिडिओ हे "मृणाल'चे वैशिष्ट्य आहे. गेल्या काही वर्षांत विनामूल्य शिक्षण देण्याच्या क्षेत्रात "मृणाल'ने नाव कमावले आहे. "यूपीएससी' उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार "मृणाल'चा आधार घेण्याचा सल्ला देतात. "यूट्यूब'वर मोठ्या संख्येत "मृणाल'चे व्हिडिओ आहेत. 


सिव्हिल्स डेली ः अनेक "यूपीएससी' टॉपर्स आणि तज्ज्ञांनी "सिव्हिल्स डेली' ऍपची शिफारस केली आहे. "आयएएस' अधिकारी बनण्यासाठी आवश्‍यक असणारे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींसाठी हे सर्वोत्कृष्ट मोबाईल ऍप समजले जाते. ऍपवर रोज प्रकाशित केले जाणारे न्यूजकार्ड "आयएएस'च्या तयारीसाठी उपयोगी ठरते. "सिव्हिल्स डेली'तर्फे चालू घडामोडी, वृत्तपत्रांचे संपादकीय सारांश, अभ्यासाच्या योजना, सरकारी योजनांवरील नोट्‌स, "एनसीईआरटी'ची पुस्तके डाउनलोड करण्याची उपलब्धता, विषयानुसार रोजच्या घडामोडी, बातम्या आणि रिव्हिजन मटेरिअल उपलब्ध करून दिले जाते. 

क्‍लिअर आयएएस ः "क्‍लिअर आयएएस' हे ऍपदेखील लोकप्रिय आहे. "यूपीएससी'साठीचे अभ्यास साहित्य (डाउनलोड प्रणालीही उपलब्ध आहे.), प्रश्न सोडविण्यासाठीच्या टिप्स, सवलतीच्या दरात पुस्तके, वेगवेगळे अहवाल आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी टॉपर्सनी काय रणनीती आखली होती, यांसारख्या गोष्टी या ऍपमध्ये आहेत. 


आयएएस बाबा ः अत्यंत दुर्गम भागातील उमेदवारालाही "आयएएस' होता यावे, यासाठी "आयआयटी' आणि "आयआयएम'च्या विद्यार्थ्यांनी हे ऍप तयार केले आहे. त्यामुळे हे सर्वात लोकप्रिय ऍप समजले जाते. रोजच्या बातम्यांचे विश्‍लेषण, चालू घडामोडींची मासिके, महत्त्वाच्या वर्तमानपत्रांचा सारांश, आकाशवाणी, आरएसटीव्ही, पीआयबीवरील चर्चा, मासिक योजना आणि प्रेरणादायी लेख विनामूल्य उपलब्ध आहेत. ज्यांनी या ऍपचे सदस्यत्व स्वीकारले आहे, त्यांच्यासाठी टेस्ट सीरिज देण्याची आणि त्याचे पुनरावलोकन करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. 

व्हिजन आयएएस ः "व्हिजन आयएएस' या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेनेही स्वत:चे ऍप तयार केले असून, याद्वारे विस्तृत अभ्यास साहित्य आणि सामग्री उपलब्ध केलेली आहे. जवळपास सर्व विषय, मॉक टेस्ट, चालू घडामोडींची मासिके, आकाशवाणीचे काही भाग, माहितीवर आधारित आलेख, यशस्वी विद्यार्थ्यांकडून टिप्स आणि तज्ज्ञ, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. 
"व्हिजन आयएएस'चे "टेलिग्राम' चॅनेलही लोकप्रिय आहे. या चॅनेलवर अभ्यासाचे विपुल साहित्य उपलब्ध केले जाते. 


अनऍकॅडमी ः हा देशातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म समजला जातो. या ऍपमध्ये अभ्यास साहित्य, वर्तमानपत्रांचे विश्‍लेषण आणि दैनिक संपादकीय लेख, मासिके, चालू घडामोडी, व्हिडिओ व्याख्याने आणि सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध आहेत. "यूपीएससी'चा विस्तृत अभ्यासक्रम, निबंध लेखन आणि पर्यायी विषयांची सामग्री (ऑप्शनल सब्जेक्‍ट) हेदेखील उपलब्ध आहे. हे ऍप विनामूल्य आणि "गुगल' प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. टॉपर्सद्वारे हे ऍप चालविले जाते. 

"गुगल' प्ले स्टोअरवर यांसारखी आणखी ऍप्स उपलब्ध आहेत. प्रत्येक ऍपचे स्वत: वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार दोन-तीन ऍप्सचा वापर करता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com