गुगल, यू-ट्युबला कारणे दाखवा नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 February 2017

न्यायालयातील सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रकरण 

न्यायालयातील सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रकरण 

मुंबई : उच्च न्यायालयातील सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग गुगल आणि यू-ट्युबवर "स्टिंग' या सदराखाली अपलोड केल्याप्रकरणी, न्यायालयाचा अवमान होत असल्याने या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच हे चित्रीकरण तातडीने हटविण्याचे आदेशही न्या. अभय ओक आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने दिले. 
बॉम्बे बार असोसिएशनने या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका करत संबंधित वकील आणि इतरांविरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली होती. यासाठी महाधिवक्ता रोहित देव यांची परवानगी मिळाल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाच्या अवमानप्रकरणी याचिका दाखल करताना महाधिवक्‍त्यांची परवानगी आवश्‍यक आहे. न्यायाधीशांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या प्रतिक्रिया या व्हिडीओ रेकॉर्डिंगवर आल्याचेही त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनाला आणून दिले. दरम्यान, हे प्रकरण उघड झाल्यानंतर उच्च न्यायालयात कोर्टरूममध्ये प्रवेश करतेवेळी मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे. 
वकील वगळता अन्य कोणालाही कोर्टरूममध्ये मोबाईल नेता येत नाही. या प्रकरणी प्रतिवाद्यांपैकी तिघांच्या संभाषणाची प्रत न्यायालयात सादर करण्यात आली नसल्याने ती तीन दिवसांत देण्यास सांगत, सुनावणी 24 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombay HC issues notice to Google, YouTube over "judge sting" video