अर्थसंकल्पानंतर तुमच्या स्मार्टफोनचं बजेट बिघडणार; जाणून घ्या

टीम ई सकाळ
Wednesday, 3 February 2021

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या काही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनचं बजेटही यामुळे बिघडू शकतं. 

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या काही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनचं बजेटही यामुळे बिघडू शकतं. 

चार्जर, युएसबी, अॅडाप्टर
सरकारने अर्थसंकल्पात चार्जर, अॅडाप्टर आणि केबलसारख्या उत्पादनांवरील आयात शुल्क अडीच टक्के केलं आहे. सध्या हे आयात  शुल्क शून्य आहे. तर दुसरीकडे चार्जरमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवरचे शुल्क 10 टक्क्यांवरून 15 टक्के इतकं करण्यात आलं आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2021 पासून चार्जर, केबल, अॅडाप्टर आणि युएसबी अॅक्सेसिरीजच्या किंमती वाढणार आहेत. 

हे वाचा - गुगल 5 हजार जणांना देणार नुकसान भरपाई

उच्च दर्जाचे कॅमेरा फोन महागणार
हायएंड स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कनेक्टर, कॅमेरा सेटअपमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रिंटेड सर्किट बोर्ड अॅसेम्बलीवर आयात शुल्क 15 टक्के इतकं करण्यात आलं आहे. यामुळे चांगल्या कॅमेऱ्याचा किंवा टाइप सी पोर्टचे फोन महागणार आहेत.

 फोन दुरुस्ती महाग
कॅमेरा, कनेक्टर आणि इतर पार्ट महाग झाल्यामुळे फोनचं रिपेअरिंग महाग होणार आहे. लिथियम आयन बॅटरीवरसुद्धा आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे. यामुळे बॅटरी बदलणेसुद्धा महाग होईल.

हे वाचा - WhatsApp Web साठी नवं फिचर; फेस आयडी, फिंगरप्रिंट पुरवणार अधिक सुरक्षा

फोनसोबत अॅक्सेसिरीज मिळणार नाहीत
आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर आता सॅमसंग, अॅपलनंतर इतर कंपन्यासुद्धा काही निर्णय घेऊ शकतात. यामध्ये फोनसोबत दिल्या जाणाऱ्या चार्जर, हेडफोन आणि केबल देणं बंद होऊ शकतं. त्यामुळे फोन चार्जिंगसाठी वेगळा चार्जर खरेदी करावा लागू शकतो. 

मेड इन इंडिया अॅक्सेसिरीज
आयात शुल्क वाढवण्याचा अर्थ  मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना भारतातच पार्ट तयार करण्यासाठी भाग पाडणं. त्यामुळे आता फोन आणि आणि त्याच्यासोबत मिळणाऱ्या अॅक्सेसिरीज मेड इन इंडिया असू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: budget 2021 tax mobile parts price smartphone accessories