श्‍वानांमधून पसरला कर्करोग

सम्राट कदम
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

संपूर्ण जगाला भयग्रस्त करणारा कर्करोग सहा हजार वर्षांपूर्वी कुत्र्यांच्या माध्यमातून पसरला असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.

संपूर्ण जगाला भयग्रस्त करणारा कर्करोग सहा हजार वर्षांपूर्वी कुत्र्यांच्या माध्यमातून पसरला असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. गावामध्ये जुनाट वाड्याच्या ओसरीला पाय दुमडून बसलेल्या कुत्र्याच्या अंगावर आणि स्पेनमध्ये गुळगुळीत रस्त्यावर ऊन घेणाऱ्या कुत्र्याच्या अंगावर एकाच प्रकारचा ‘ट्यूमर’ वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याच्या शेपटीवर अथवा जांघेत स्रवणारा द्रव, सूज ही एकाच गुणसूत्राची देण असून, ती सहा हजार वर्षांपूर्वीची कर्करोगाची पेशी आहे.

यासंबंधीचा शोधनिबंध शुक्रवारी (ता. २) ‘सायन्स’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे. यामध्ये काही धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. हजारो वर्षांपासून जगामध्ये वाढत चाललेला कर्करोग, त्याची वाटचाल आणि होणारे बदल यात स्पष्ट करण्यात आले आहेत. ‘कॅनीन ट्रान्समिसेबल व्हेनिरियल ट्यूमर’ (सीटीव्हीटी) हा कर्करोग कुत्र्यांमध्ये संसर्गजन्य म्हणून आढळतो. प्रामुख्याने जननेंद्रियाचा असलेला हा कर्करोग नर आणि मादी दोघांमधेही आढळतो. संपूर्ण जगातील सर्व प्रकारच्या कुत्र्यांच्या (श्‍वानांच्या) प्रजातीमध्ये हा कर्करोग आढळत असल्याचे संशोधनातून पुढे आले. संसर्गजन्य कर्करोगाचा अभ्यास करणाऱ्या केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने जगभरातील कुत्र्यांवर संशोधन केले. यामध्ये हा कर्करोग होतो कसा?, त्याची वाढ आणि त्याची पसरण्याची पद्धत यांचा अभ्यास करण्यात आला. संशोधक ॲड्रियन बीझ ऑर्टेगा म्हणाल्या, ‘‘कुत्र्यांमध्ये आढळणाऱ्या या कर्करोगाचा जगातील सर्व खंडांमध्ये विकास झाल्याचे दिसून येते. संसर्ग झालेल्या कुत्र्यांच्या गुणसूत्रात झालेला बदल या कर्करोगाची वाटचाल कशी झाली असेल हे स्पष्ट दर्शवतो. सुमारे चार हजार ते ८ हजार ५०० वर्षांपूर्वी या कर्करोगाचा उदय झाल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. 

मुख्यत्वे आशिया आणि युरोपीय खंडांमध्ये याची सुरवात झाली असावी.’’ आधुनिक कर्करोगासाठी कारणीभूत असलेल्या ‘ट्यूमर’चा पूर्वज सुमारे एक हजार ९०० वर्षांपूर्वीचा असावा असे संशोधकांना वाटते. हा कर्करोग प्रामुख्याने युरोपातून सर्व जगभर पसरला असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा युरोपियन देश वसाहती करत संपूर्ण जगभर पसरले तेव्हा त्यांनी सोबत नेलेल्या कुत्र्यांमधून हा कर्करोग जगभर पसरला. अमेरिका, आफ्रिका आणि पुन्हा आशियात या कर्करोगाचा प्रसार झाला.

कर्करोगाच्या जीवशास्त्रात झालेल्या नवीन संशोधनामुळे शास्त्रज्ञांना ट्यूमरच्या गुणसूत्रांतील बदल आणि त्याच्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांचा शोध घेता आला आहे. या संशोधनाचा वापर करत शास्त्रज्ञांनी पाच वेगवेगळ्या जैविक प्रक्रियांचा अभ्यास केला की ज्यांचा ‘कॅनिन ट्यूमर’वर विपरीत परिणाम होतो. त्यामध्ये ‘अतिनील किरणां’चा परिणामही अभ्यासण्यात आला. या अभ्यासामुळे कर्करोगाची हजारो वर्षांपासून बदलत जाणारी वंशावळच समोर येते. त्याच्या गुणसूत्रात झालेला बदल, त्यावर परिणाम करणारे पर्यावरणीय घटक या सगळ्यांचा अभ्यास यातून शक्‍य झाला आहे.

माणसात आढळणाऱ्या ट्यूमरचा संबंध
संशोधनातून प्रामुख्याने ट्यूमरमध्ये झालेले दोन प्रकारचे उत्क्रांतीचे सिद्धांत समोर मांडण्यात येतात. यानुसार एक सकारात्मक बदल घडवणारा तर दुसरा नकारात्मक बदल घडवणारा ट्यूमर असतो. ट्यूमरमध्ये झालेल्या सकारात्मक बदलामुळे कुत्र्यांच्या अवयवांमध्ये आवश्‍यक ते बदल झाले. परिस्थितीनुसार आवश्‍यक बदल त्यांनी केले. तर दुसरीकडे नकारात्मक बदल की जे आधुनिक कर्करोगाला कारणीभूत ठरले. परंतु संशोधकांना या प्रकारातील कोणताही सकारात्मक अथवा नकारात्मक बदल या कर्करोगात आढळून आला नाही. याचाच अर्थ असा की ट्यूमरमध्ये झालेला बदल हा काळानुरूप बदलत्या कुत्र्यांच्या राहणीमानासाठी आणि पर्यावरणासाठी योग्य नव्हता. 

माणसातील कर्करोगाला कारणीभूत ट्यूमरमध्ये उत्क्रांतीसाठी फार कमी कालावधी भेटतो, त्यामुळे इतर परजीवाकडून आलेल्या ट्यूमरसोबत त्यांना मोठा लढा द्यावा लागतो. त्यांच्यामध्ये उत्क्रांतीची वेगळी पद्धत आहे. ज्यामध्ये ट्यूमरमधील वेगवेगळ्या गुणसूत्रांची लढत होते आणि त्यांतील जे प्रभावी आणि सक्षम असतील तेच शेवटपर्यंत टिकतात आणि त्यांचा विकास होतो. मानवी ट्यूमरमधील २०० वाहक गुणसूत्रांची ओळख पटविण्यात आली आहे. यातील फक्त पाच गुणसूत्रे हे उत्क्रांती करण्यास सक्षम असल्याचे आढळले. ही पाचही गुणसूत्रे कर्करोगाचा पुराणपुरुष असलेल्या कुत्र्याच्या ‘ट्यूमर’मधील आहेत. यातून कर्करोगाचा प्रसार हा माणसाचा पाळीव प्राणी असलेल्या कुत्र्यामधून गेली पाच हजार वर्षामध्ये झाल्याचे स्पष्ट होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer spread by dogs

टॅग्स