
Aadhaar Safety Tips : नवीन तंत्रज्ञान जितकं प्रगत होतंय, तितकंच त्याचा वापर गुन्हेगारीसाठी होण्याचा धोका वाढतोय. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरून बनवले जाणारे बनावट कागदपत्रे ही सध्या सायबर सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चिंतेची बाब बनली आहे. यामध्ये खासकरून आधार कार्ड, पासपोर्ट आणि KYC संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला आणि विविध संस्थांच्या विश्वसनीयतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
OpenAI कंपनीने त्यांच्या ChatGPT या AI टूलमध्ये अलीकडेच फोटो जनरेशन फिचर आणले आहे. यामुळे वापरकर्त्यांना अत्यंत वास्तवदर्शी (realistic) फोटो तयार करता येतात. जरी या तंत्रज्ञानाचा वापर सर्जनशीलतेसाठी आणि उत्पादकतेसाठी केला जात असला, तरी सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे. कारण हेच फिचर वापरून सायबर गुन्हेगार बनावट ओळखपत्रं तयार करत आहेत, जी पाहणाऱ्याला खरी वाटतील इतकी विश्वासार्ह असतात.
AI द्वारे तयार होणाऱ्या बनावट दस्तऐवजांमुळे KYC फसवणुकीचा धोका प्रचंड प्रमाणात वाढला आहे. बँका, विमा कंपन्या, टेलिकॉम सेवा, लॉजिस्टिक्स, शिक्षण संस्था आणि आरोग्य सेवा क्षेत्रांमध्ये या फसवणुकीचा थेट फटका बसू शकतो. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर KYC कागदपत्रांद्वारे खोटी ओळख तयार केली जाते आणि त्याचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जाते.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्याचे फसवणूक ओळखण्याचे तंत्रजसे की वॉटरमार्किंग, फेसियल रिकग्निशन, किंवा मेटाडेटा तपासणी आता पुरेसे नाहीत. आजची AI-आधारित तंत्रे ही सुरक्षा यंत्रणाही फसवू शकतात. त्यामुळे खरी आणि बनावट कागदपत्रं यातील फरक करणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे.
फसवणूक केवळ दस्तऐवजापुरती मर्यादित नाही. AI च्या मदतीने बनवले जाणारे deepfake व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स आता इतक्या हुबेहुब असतात की खरे-खोटे ओळखणे जवळपास अशक्य आहे.
pi-labs या सायबर सुरक्षा स्टार्टअपचे संस्थापक अंकुश तिवारी यांच्या मते, AI वापरून होणारे हे धोके येत्या काळात आणखी गंभीर होतील. 2028 पर्यंत 40% सायबर हल्ले हे deepfake आणि सोशल इंजिनीयरिंगवर आधारित असतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
या संकटावर उपाय म्हणून तज्ज्ञांनी सुचवले आहे की, संस्थांनी AI-विशिष्ट deepfake detection systems मध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे. जेव्हा एखादं चित्र किंवा दस्तऐवज अपलोड केलं जातं, त्याच वेळी ते कृत्रिम आहे की नाही हे ओळखण्याची क्षमता या प्रणालींमध्ये असावी.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच सायबर सुरक्षेचे धोकेही वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आणि संस्थांनी सुरक्षा उपाय अधिक मजबूत करणे, हे काळाची गरज ठरत आहे.