तळसंदेतील विद्यार्थ्यांनी बनवली सौरउर्जेवरील सायकल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

विद्युत सायकल एका चार्जिंगमध्ये १० कि. मी. अंतर कापू शकते. तसेच सोलर पॅनेलचा वापर केल्याने तुम्ही सायकल चालवत असतानाच तसेच पार्किंगमध्येही चार्ज होते. तीन चाकांचा वापर केल्याने दिव्यांग व्यक्तीही अगदी सहजतेने याचा वापर करू शकतात.

घुणकी - तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्‍निकल कॅम्पसमधील अमित पाटील, नीलेश पाटील, राकेश फडतरे आणि सोहेल शेख या विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे. 

सध्याच्या युगात खनिज ऊर्जेचे साठे संपुष्टात येत असतानाच अपारंपरिक पण मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सौर ऊर्जेकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. याच सौर ऊर्जेचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी भारत सरकार काम करीत आहे. यात आपलाही वाटा असावा या प्रेरणेतून डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागाच्या अमित पाटील, नीलेश पाटील, राकेश फडतरे आणि सोहेल शेख यांनी प्रा. रोहित केर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्ष वार्षिक प्रकल्पाचा भाग म्हणून बहुउपयोगी मॉडेल विकसित करण्याचे ठरवले व त्या कामात यश मिळवले. 

लवकरच बाजारात
विद्युत सायकल एका चार्जिंगमध्ये १० कि. मी. अंतर कापू शकते. तसेच सोलर पॅनेलचा वापर केल्याने तुम्ही सायकल चालवत असतानाच तसेच पार्किंगमध्येही चार्ज होते. तीन चाकांचा वापर केल्याने दिव्यांग व्यक्तीही अगदी सहजतेने याचा वापर करू शकतात. सध्या बाजारात उपलब्ध विद्युत सायकलपेक्षा कमी खर्चात तयार झालेली ही सौर सायकल लवकरच बाजारात उपलब्ध करू, असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. सतीश पावसकर यांनी व्यक्त केला. तसेच यासंबंधी काही उद्योजकांशी बातचीत चालू असल्याचीही माहिती दिली.

संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, संचालक डॉ. सतीश पावसकर, अधिष्ठाता प्रा. राजेंद्र पोवार, रजिस्ट्रार  प्रकाश भागाजे यांचे सहकार्य लाभले. विभागप्रमुख प्रा. मन्नान फरास, प्रा. रोहित श्रीपती केर्लेकर यांनी प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cycle on solar power made by students Kolhapur Talsande