Mendeleev's Periodic Table : एक स्वप्न, संस्कृतची मदत अन् बदललं केमिस्ट्रीचं जग! 'पिरीयॉडिक टेबल'च्या निर्मितीची अनोखी कहाणी..

Dmitri Mendeleev : कोणत्याही गोष्टीचा शोध लावण्यासाठी लागणारी उपकरणं आणि तंत्रज्ञान ज्याकाळी पाळण्यात होतं तेव्हा केवळ आपल्या तर्कशक्तीच्या जोरावर मेंडेलिव्हने अक्षरशः चमत्कार घडवला होता.
Dmitri Mendeleev Periodic Table
Dmitri Mendeleev Periodic TableeSakal

Father of Periodic Table Dmitri Mendeleev : लहानपणापासून आपण आपल्या अभ्यासक्रमात असलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक नावं वाचत असतो. यातली बरीचशी नावं‌ साहजिकच विस्मृतीत जातात पण  काही नावं मात्र आवर्जून लक्षात राहतात. असंच रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या स्मृतीत कायमस्वरूपी कोरलं गेलेलं एक नाव आहे 'दमित्री मेंडेलिव्ह'! अगदी दहावी पर्यंतच जरी तुम्ही विज्ञान शिकला असाल तरी आवर्त सारणी तुम्हाला ठाऊक असेलच. जगभरात मॉडर्न पिरीयॉडीक टेबल म्हणून अतिप्रसिद्ध असलेल्या या मूलद्रव्यांच्या कोष्टकाचा अर्थातच आवर्त सारणीचा जनक म्हणून मेंडेलिव्हला ओळखलं जातं. 

8 फेब्रुवारी 1834 रोजी अति बर्फाळ सैबेरीयाच्या कुशीत जन्मलेल्या या अलौकिक बुद्धिमत्तेच्या माणसाने रसायनशास्त्र अभ्यासण्याच्या सोप्या (त्यातल्यात्यात?) मार्गाचा दरवाजा सर्वांसाठी केवळ खुलाच नाही केला तर तो स्वहस्ते घडवला असं म्हणायला हरकत नाही. कोणत्याही गोष्टीचा शोध लावण्यासाठी लागणारी उपकरणं आणि तंत्रज्ञान ज्याकाळी पाळण्यात होतं तेव्हा केवळ आपल्या तर्कशक्तीच्या जोरावर मेंडेलिव्हने अक्षरशः चमत्कार घडवला होता.

आजच्या आवर्त सारणीत एकूण ११८ मूलद्रव्ये आहेत, त्यापैकी केवळ ६३ म्हणजे जवळपास निम्मी मूलद्रव्ये मेंडेलिव्हच्या कार्यकाळात ज्ञात होती. तरीही आजवरच्या सर्व मूलद्रव्यांना योग्य जागा देता येईल असं मूलद्रव्यांचं कोष्टक त्याने १८६९ साली जगासमोर मांडलं. अणुच्या केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन नावाचे कण असतात. या कणांच्या वस्तुमानाची बेरीज म्हणजेच अणुचे एकूण वस्तुमान होय. या अणुच्या वस्तुमानावर आधारित मूलद्रव्यांची मांडणी म्हणजेच मेंडेलिव्हची आवर्त सारणी (Mendeleev's Periodic Table) होय. या आवर्त सारणीत त्याकाळी शोधही न लागलेल्या अज्ञात मूलद्रव्यांसाठी त्याने मोकळ्या जागा सोडल्या होत्या, एवढंच नव्हे तर या मोकळ्या जागेत येणाऱ्या मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म काय असतील याचाही त्याने अचूक अंदाज बांधला होता. (Mendeleev Predictions)

Dmitri Mendeleev Periodic Table
Stephen Hawking : जेव्हा जगातील महान वैज्ञानिकाने 'टाईम-ट्रॅव्हलर्स'साठी पार्टी ठेवली होती...

पुस्तकाची कमतरता

बरं या साऱ्या शोधा मागची प्रेरणा काय होती; तर एका योग्य पुस्तकाची कमतरता! १८६५ साली सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात रसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदी नेमणूक झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी साजेसं पुस्तक सापडत नाही म्हणून अखेर कंटाळून त्याने स्वतः पुस्तक लिहिण्याचा पर्याय निवडला. 'रसायनशास्त्राची तत्वे' अर्थातच Principles of Chemistry या जगप्रसिद्ध पुस्तकाचा यातून जन्म झाला.

याच पुस्तकासाठी त्याने सर्व ज्ञात मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा सखोल अभ्यास केला. अशाच एका रात्री पुस्तकाची मांडणी करताना थकून आलेल्या ग्लानीत त्याला एक स्वप्न पडलं ज्यात त्याला आवर्त सारणी स्पष्ट दिसली. थोड्याफार फरकांसहीत तीच आवर्त सारणी त्याने जाग आल्यावर लिहून काढली आणि पुढे हीच मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणून प्रसिद्ध झाली! (Mendeleev Dream)

Dmitri Mendeleev Periodic Table
Isaac Newton : जादूटोण्याच्या मार्गाला लागला होता प्रसिद्ध वैज्ञानिक न्यूटन; शोधत होता 'परीस'.. पण का?

संस्कृतची मदत

या आवर्त सारणीचं अजून एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे, यात मेंडेलिव्हने संस्कृत व्याकरणकार पाणिनीचा सन्मान करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. मोकळ्या जागा सोडलेल्या त्या अज्ञात मूलद्रव्यांची जागा दर्शविण्यासाठी त्याने 'एक, द्वि, त्रि' अशा संस्कृत उपसर्गांचा वापर करून ध्वनीच्या द्विमितीय रचनेवर आधारित भाषाशास्त्र निर्माण करण्याच्या पाणिनीच्या प्रतिभेचा गौरव केला आहे. उदाहरणार्थ, सिलिकॉन नंतरच्या पहिल्या घरातील मूलद्रव्य हे एक-सिलिकॉन (आत्ताचे जर्मेनियम), मॅंगनीज नंतर दोन घरं सोडून असणारं ते द्वि-मॅंगनीज (आत्ताचे रिनियम) अशा पद्धतीने त्याने या मूलद्रव्यांचे नामकरण केले होते! (Mendeleev and Sanskrit) 

Mendeleev Periodic Table Sanskrit Names
Mendeleev Periodic Table Sanskrit NameseSakal

पुढे त्याने भाकित केलेल्या मूलद्रव्यांचा शोध लागल्यानंतर आणि त्यांचे गुणधर्म जवळपास तंतोतंत जुळतात हे लक्षात आल्यानंतर, आधी त्याच्या शोधाकडे कानाडोळा करणारं जग मात्र त्याच्या बुद्धिमत्ते पुढे नतमस्तक झालं. त्याच्या अक्षरशः भजनी लागलं! तरीही नोबेल पुरस्काराने तीन वेळा त्याला हुलकावणी दिली असं म्हणतात. अर्थात, मेंडेलिव्हसारख्या हरहुन्नरी संशोधकांच्या भात्यात जमा न होऊ शकणं हे नोबेलचं दुर्दैव म्हणावं लागेल. कारण कोणतेही पुरस्कार त्याच्या नावे असोत वा नसोत, आवर्त सारणीचा जनक म्हणून तो कायमचा लोकांच्या स्मृतीत राहील यात शंका नाही!

- मैत्रेयी बांदेकर

(लेखिका 'टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, मालवण' येथे केमिस्ट्रीच्या शिक्षिका आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com